नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी: भारताने जगभरातील 20 देशांमध्ये जवळपास 2 कोटी 29 लाख कोरोना व्हॅक्सिनचे (covid-19) डोस पाठवले आहेत. काही ठिकाणी मदत म्हणून तर काही ठिकाणी व्यावसायिक स्वरुपात भारताने कोरोना लशीचे डोस पाठवले आहेत. या 20 देशांमध्ये भारताकडून कोरोना व्हॅक्सिनचे (Coronavirus Vaccine) 64 लाख डोस अनुदानाच्या स्वरुपात तर 165 लाख डोस व्यावसायिक स्वरुपात भारताकडून पाठवण्यात आले आहेत. येणाऱ्या आठवड्यात आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेतील काही देशांत पुरवठा केला जाणार आहे.
शेजारी देशांना सर्वात आधी पुरवठा
भारताने मैत्री इनिशिएटिव्ह (Vaccine Maitri initiative) अंतर्गत गरजवंत देशांना अनुदान अर्थात मोफत व्हॅक्सिन पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने आपल्या शेजारी देशांना सर्वात आधी व्हॅक्सिन पुरवठा करण्याचे धोरण ठेवले आहे. 'पड़ोसी पहले' या निती अंतर्गत भारताने शेजारी देशांना आधी कोरोना व्हॅक्सिन देण्याचा निर्णय घेतला आहे. 21 जानेवारीपासून भारताने ही मोहीम सुरू केली आहे, ज्याचे जगभरातून कौतुक केले जात आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर कोरोना व्हॅक्सिन पाठवण्याचे काम राहणार जारी
विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी अशी माहिती दिली की, आंतरराष्ट्रीय स्तरावर लशीचा डोस पाठवण्याचे काम भारत पुढे देखील सुरू ठेवणार आहे आणि टप्प्याटप्प्याने यामध्ये अनेक देशांना सामील केले जाणार आहे. त्यांनी अशी माहिती दिली आङे की, शेजारी देशांव्यतिरिक्त भारतीय समुद्रिय, कॅरेबियन देश आणि पश्चिम आशियायी देशांतही भारत कोरोना व्हॅक्सिनचा पुरवठा करणार आहे.
(हे वाचा-धक्कादायक! आखाड्यात कोचने केला गोळीबार; 5 जणांचा मृत्यू तर तिघे जखमी)
कोव्हिशिल्ड (Covishield) ने भारताला 'व्हॅक्सिन डिप्लोमसी' मध्ये भारताला चीनपेक्षा खूप पुढे नेलं आहे. चिनी व्हॅक्सिनला मुठभर देशांनीच मान्यता दिली आहे. तर भारताच्या व्हॅक्सिनला जगातील सर्वाधिक देशांनी मान्यता दिली आहे. चीनने केवळ नेपाळ आणि पाकिस्तानला व्हॅक्सिन पुरवठा केला आहे.
कुठे कुठे पाठवण्यात आले व्हॅक्सिन?
अनुदान म्हणून भारताने कोरोना लशीचे डोस बांग्लादेश (20 लाख), म्यानमार (17 लाख), नेपाळ (10 लाख), भूटान (1.5 लाख), मालदीव (एक लाख), मॉरिशस (एक लाख), सेशेल्स (50,000), श्रीलंका (पाच लाख), बहरीन (एक लाख), ओमान (एक लाख), अफगाणिस्तान (पाच लाख), बारबडोस (एक लाख) आणि डोमिनिका (70,000) याठिकाणी पाठवले आहेत.
तर व्यावसायिक स्वरुपात ब्राझिल (20 लाख), मोरक्को (60 लाख), बांग्लादेश (50 लाख), म्यानमार (20 लाख), इजिप्त (50,000), अल्जेरिया (50,000), दक्षिण आफ्रिका (10 लाख), कुवैत (दोन लाख), यूएई (दोन लाख) लशीचे डोस पाठवले आहेत.
विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी ही माहिती दिली आहे. त्यांने असे म्हटले आहे की, भविष्यात आफ्रिका, लॅटिन अमेरिका, केरीकॉम याठिकाणच्या देशांमध्ये व्हॅक्सिनचा पुरवठा केला जाणार आहे.