नवी दिल्ली, 06 मे : कोरोनाव्हायरसविरोधात (Coronavirus) जगभरात लस विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यात आता एका वेगळ्या पद्धतीनं तयार करण्यात आलेल्या लसीचं ह्ययुमन ट्रायल सुरू झालं आहे. अमेरिकेतील फाइजर (Pfizer) आणि जर्मनीतील बायोएनटेक (BioNtech) या कंपन्यांनी एकत्रितरित्या ही लस विकसित केली आहे, ज्याचं सोमवारपासून ह्युमन ट्रायल सुरू करण्यात आलं आहे. जर हे ट्रायल यशस्वी झालं तर ही लस लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
मेसेंजर RNA या जेनेटिक मटेरियलच्या आधारावर ही लस विकसित करण्यात आली आहे. लस विकसित करण्याचं ही प्रक्रिया पारंपारिक प्रक्रियेपेक्षा वेगळी आणि जलद आहे. पारंपारिक लस बनवण्याच्या प्रक्रियेत कमजोर व्हायरसच्या मदतीनं मानवी शरीरात अँटिबॉडीज तयार केल्या जातात, ज्यामुळे ती शरीरात काम करायला खूप कालावधी जातो.
कशी काम करणार ही लस?
मानवी शरीरातील पेशींना प्रोटिन बनवण्याच्या सूचना देण्याचं काम मेसेंजर RNA चं असतं. विशेष पद्धतीनं तयार करण्यात आलेल्या या मेसेंजर RNA ला मानवी शरीरात टाकलं जाईल जेणेकरून ते पेशींना कोरोनाव्हायरससाठी स्पाइक प्रोटिन तयार करण्याच्या सूचना देतील.
हे वाचा - काय म्हणताय! आता 'हा' प्राणी माणसांंना Coronavirus पासून वाचवणार?
या प्रक्रियेत कोणती व्यक्ती आजारीही नाही पडणार सामान्यपणे हा व्हायरस या प्रोटिनचा वापर करून फुफ्फुसातील पेशींपर्यंत पोहोचतो. अशात ही लस रोगप्रतिकारक प्रणालीला व्हायरसशी लढण्यासाठी अँटिबॉडी बनवण्याचं काम करेल.
पहिल्या टप्प्यातील ह्युमन ट्रायल सुरू
अमेरिकेतील फायजर आणि जर्मनीतील बायोएनटेक या कंपन्यांनी गेल्या महिन्यात BNT162 लसीचं जर्मनीतील 12 निरोगी लोकांवर ट्रायल केलं होतं, त्यानंतर 1,200 लोकांवर ट्रायल करण्यात आलं होतं. आता या दोन्ही कंपन्या मिळून अमेरिकेत लसीचं पहिल्या टप्प्यात 360 लोकांवर ट्रायल करणार आहे. दुसऱ्या टप्प्यात 8000 लोकांचा समावेश केला जाईल.
हे वाचा - कोरोनाचा आपोआपच नाश होणार? शास्त्रज्ञांना दिसून आला व्हायरसमध्ये विशेष बदल
हा स्टडी न्यूयॉर्कच्या चार मेडिकल सेंटरमध्ये केला जातो आहे. यामध्ये न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीच्या ग्रॉसमॅन स्कूल ऑफ मेडिसीन, युनिव्हर्सिटी ऑफ रोकेस्टर मेडिकल सेंटर, युनिव्हर्सिटी ऑफ मेरिलँड स्कूल ऑफ मेडिसीन आणि सिनसिनाटी चिल्ड्रन्स हॉस्पिटल मेडिकल सेंटरचा समावेश आहे.
Moderna, Inovio, Cansion आणि इतर फार्मा कंपन्याही याच प्रक्रियने लस तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. काही कंपन्यांनी गेल्या आठवड्यातच पहिल्या टप्प्यातील ह्युमन ट्रायल सुरू केलं होतं. मात्र अद्याप अशी लस बाजारात आली नाही.
भारतातही 5 लस अंतिम टप्प्यात
कोरोनाव्हायरसविरोधातील लस तयार करण्यासाठी भारतातही काही कंपन्यांनी पुढाकार घेतला आहे. देशात 5 वॅक्सिन अंतिम टप्प्यात असून लवकरच त्यांची ट्रायल होणार असल्याची माहिती मिळत आहे. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लस शोधणाऱ्या डॉक्टरांच्या टास्क फोर्ससोबत मंगळवारी बैठक घेतली.
हे वाचा - दुधाची तहान ताकावर...कोरोना लॉकडाऊनमुळे दारू मिळेना, मग लोकांनी काय केलं पाहा
या बैठकीत कोरोनावर प्रतिबंध करणारी लस शोधण्याबाबत आढावा घेतला आहे. या व्हायरची लस शोधण्याची मोहीम कुठपर्यंत आली आहे आणि किती वेळ लागू शकतो याबाबतही चर्चा केली. सध्या करोनाविरोधात लढण्यासाठी विविध प्रकारच्या 30 लसींवर काम सुरू आहे.
संकलन, संपादन - प्रिया लाड
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.