नवी दिल्ली, 06 मे : कोरोनाव्हायरसचा (coronavirus) प्रसार रोखण्यासाठी अनेक देशांमध्ये लॉकडाऊन (lockdown) लागू करण्यात आला आहे आणि यामुळे तळीरामांचीही गैरसोय झाली आहे. भारतात तिसऱ्या टप्प्यातल्या लॉकडाऊनमध्ये दारूची दुकानं (Alcohol shop) सुरू ठेवण्याच्या निर्णयामुळे या तळीरामांना चांगलीच संधी मिळाली आणि दारूसाठी त्यांची झुंबड उडाली. मात्र दक्षिण आफ्रिकेत लॉकडाऊनमध्ये दारूही मिळेनाशी झाली, त्यामुळे आता तिथल्या नागरिकांनीच एक वेगळी शक्कल लढवली आहे.
दक्षिण आफ्रिकेत लोकांनी आता घरातच दारू बनवायला सुरुवात केली आहे तीदेखील अननसाचा (Pineapple) वापर करून. या देशात लॉकडाऊनमध्ये अननसाचा खप जास्त होतो आहे. अननसाची दररोजची सरासरी विक्री 10,000 वरून जवळपास 1 लाखावर पोहोचली आहे. म्हणजे अननसाची व्रिक्री तब्बल दहापटीनं वाढली आहे.
हे वाचा - काय म्हणताय! आता 'हा' प्राणी माणसांंना Coronavirus पासून वाचवणार?
अननस, साखर आणि यिस्ट यांचा वापर करून दारू तयार केली जात आहे. हे तिन्ही पदार्थ योग्य प्रमाणात मिसळल्यास अल्कोहोलसारखं ड्रिंक तयार होतं, असं सांगितलं जातं आहे.
दक्षिण आफ्रिकेत कोरोना लॉकडाऊनचा 46 वा दिवस चालू आहे आणि काही कालावधीसाठी हा लॉकडाऊन कायम राहू शकतो. लॉकडाऊनमुळे दारू विक्रीही बंद आहे. त्यामुळे तळीराम दुधाची तहान अशी ताकावर भागवताना दिसत आहेत.
दारू विक्रीमुळे महाराष्ट्राला महसूल
देशात 4 मे रोजी लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी करण्यात आली. ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोननुसार आणि नियमांचे पालन करत दारूची दुकानं उघडण्यात आली होती. तब्बल दीड महिन्यानंतर दारूची दुकानं उघडल्यामुळे तळीरामांची एकच झुंबड उडाली होती. ठिकठिकाणी वाईन शॉप्सवर तळीरामांच्या रांगाच्या रांगा पाहण्यास मिळाल्या होत्या.
हे वाचा - कोरोनाचा आपोआपच नाश होणार? शास्त्रज्ञांना दिसून आला व्हायरसमध्ये विशेष बदल
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतिलाल उमाप यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात एका दिवसात 10 ते 11 कोटींचा महसूल जमा झाला आहे. एका दिवसात राज्यभरात ठिकठिकाणी आलेल्या आकडेवारी नुसार, 3 ते 4 लाख लिटर दारूची विक्री झाली आहे. यातून ही 10 ते11 कोटी महसूल मिळाला असून यात आणखी वाढ होणार आहे.
मुंबईत पुन्हा दारूची दुकानं बंद
लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू झाल्यानंतर देशाची आर्थिक बाजू सांभाळण्यासाठी परवानगी देण्यात आली खरी पण मुंबईतील मद्यप्रेमींना मात्र आता दारू मिळणार नाही. सोमवारी दारूची दुकानं उघडताच मुंबईसारख्या रेड झोनमध्ये दारूसाठी तळीरामांनी मोठी गर्दी केली. यात सोशल डिस्टंसिंगचा पुरता फज्जा उडाला. सोशल मीडियावरून आणि इतर नागरिकांकडून लोकांची गर्दी वाढली असल्याच्या अनेक तक्रारी आल्यामुळे महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. मुंबईत दारू विक्रीवर बंदी घालण्याचा आदेश महापालिकेकडून देण्यात आला आहे.
संकलन, संपादन - प्रिया लाड
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.