मॉस्को, 26 ऑक्टोबर: जवळपास गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीनं (
corona pandemic) जगभरात धुमाकूळ घातलेला आहे. आतापर्यंत कोट्यवधी लोकांना कोरोनाची लागण होऊन गेली आहे. त्यातील काहींना कोरोनावर मात करणं शक्य झालं तर काहींना आपला जीव गमवावा लागला. मध्यंतरी कोरोनाचा प्रभाव काहीसा कमी झाल्यानं जगभरातील विविध राष्ट्रांनी आपल्या देशातील परिस्थितीचा आढावा घेऊन कोविड निर्बंध हटवले होते. जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येण्याच्या मार्गावर होतं. मात्र, आता पुन्हा काही देशांमध्ये कोरोना महामारीनं डोकं वर काढल्याचं दिसत आहे. रशिया (
Coronavirus in Updates Russia), ब्रिटन (
Britain Coronavirus Update) आणि चीनमध्ये (
China Coronavirus) कोरोना रुग्णांमध्ये वेगाने वाढ होत आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटमध्येदेखील बदल झाल्यानं भीतीचं वातावरण आहे.
जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत जगभरातील 24.36 कोटींपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची बाधा झालेली आहे. यापैकी 49.4 लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. न्यूज एजन्सी आयएएनएसच्या अहवालानुसार, अमेरिकेवर कोरोनाचा सर्वात जास्त परिणाम झालेला आहे. त्या ठिकाणी 4 कोटी 54 लाख 44 हजार 228 नागरिकांना कोरोनाची बाधा झाली तर 7 लाख 35 हजार 930 जणांचा मृत्यू झालेला आहे.
हे वाचा-चिंता वाढवणारी बातमी, कोरोनाचा नवा व्हेरिएंट 'AY-4'; सापडले 7 रुग्ण
ब्रिटनमध्ये चिंता वाढली
ब्रिटनच्या चिंतेमध्ये वाढ होताना दिसत आहे. ब्रिटनमध्ये रविवारी (24 ऑक्टोबर 2021) एका दिवसात कोरोनाचे 39 हजार 962 रुग्ण आढळले, तर 72 रुग्णांचा मृत्यू झाला. ब्रिटनमध्ये आतापर्यंत 87 लाख 73 हजार 674 नागरिकांना कोरोना संसर्ग झाल्याची नोंद आहे. यातील 1 लाख 39 हजार 533 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूचा डेल्टा प्लस व्हेरिएंट यूकेमध्ये धुमाकूळ घालत आहे. कोरोनाच्या डेल्टा स्ट्रेनचा उप-स्ट्रेन असलेला डेल्टा-प्लस (एवाय-4.2) (Delta Plus) अत्यंत प्राणघातक असल्याचं म्हटलं जातं आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याची संसर्ग क्षमता मुख्य डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत 15 टक्क्यांनी जास्त आहे.
रशियातील परिस्थिती चिंताजनक
ब्रिटन पाठोपाठ रशियामध्ये देखील कोरोना संक्रमणाचा वेग वाढला आहे. रशियामध्ये सोमवारी (25 ऑक्टोबर 2021) एकाच दिवसात कोरोनाच्या 37 हजार 930 नवीन रुग्णांची नोंद झाली. ही रशियातील आतापर्यंतची सर्वोच्च रुग्ण संख्या आहे. गेल्या चोवीस तासात त्या ठिकाणी तब्बल 1 हजार 69 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या गेल्या आठवड्यात एका दिवसात 1 हजार 75 जणांचा मृत्यू झाला होता. त्यापेक्षा गेल्या 24 तासांतील मृत्यूची आकडेवारी काहीशी कमी आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळं संपूर्ण देशात पुन्हा लॉकडाऊन लावण्यात आले आहे यावरून आपल्याला महामारीच्या तीव्रतेचा अंदाज लावता येऊ शकतो. शासनाने नागरिकांना दीर्घ सुट्टी जाहीर केली आहे. रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन (
Vladimir Putin on corona in Russia) यांनी लोकांना 30 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबरदरम्यान कामावर न जाण्याचे आवाहन केले आहे.
हे वाचा-Sputnik V लस घेतल्यावर HIV होण्याची शक्यता? या देशाने घातली Vaccine वर बंदी
पुतीन यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशातील 85 ठिकाणी परिस्थिती विशेष गंभीर आहे. त्याठिकाणी पूर्णपणे काम थांबवलं जाणार आहे. तरी देखील परिस्थिती नियंत्रणात न आल्यास 7 नोव्हेंबरनंतरही सुट्ट्या वाढवल्या जाऊ शकतात. अत्यावश्यक सेवा आणि इतर काही पायाभूत सुविधा वगळता, बहुतेक सरकारी संस्था आणि खासगी व्यवसाय बंद ठेवले जाणार आहेत. मॉस्कोमध्ये तर या गुरुवारपासूनच (28 ऑक्टोबर 2021) सुट्टी देण्याचा विचार सुरू आहे. 11 दिवसांच्या सुट्टी दरम्यान शाळा, जिम, मनोरंजन स्थळे आणि दुकानं बंद ठेवली जाणार आहेत.
या काळात रुग्णसंख्या कमी होण्याची शासनाला अपेक्षा आहे. रशियामध्ये आतापर्यंत 82 लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झालेली आहे तर, 2 लाख 31 हजार 669 जणांचा मृत्यू झाला आहे. युरोपमधील रशिया हा एकमेव देश आहे जिथे साथीच्या रोगामुळे सर्वाधिक लोक मरण पावले आहेत. अमेरिका, ब्राझील, भारत आणि मेक्सिकोनंतर मृत्यूच्या बाबतीत रशिया जगात पाचव्या क्रमांकावर आहे. 30 ऑक्टोबरपासून जाहीर केलेल्या सुट्टीच्या काळात कार्यालये आणि सार्वजनिक वाहतूक दीर्घकाळ बंद राहिल त्यामुळं कोरोनाचा सामना करण्यास मदत होईल, अशी आशा रशियन अधिकाऱ्यांना आहे.
चीनमध्येही वाढतेय रुग्णसंख्या
ज्या ठिकाणावरून कोरोनाचा प्रसार सुरू झाला होता त्या चीनमध्ये देखील पुन्हा रुग्णसंख्या वाढत आहे. वायव्य चीनमधील गांसू प्रांतात मोठ्या प्रमाणात कोविड-19 चे रूग्ण आढळल्यानंतर सोमवारी (25 ऑक्टोबर) सर्व पर्यटन स्थळे बंद करण्यात आली आहेत. राजधानी बीजिंगमध्ये रुग्णसंख्या 21वर गेल्यानं काही भाग कोविडसाठी धोकादायक झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. एका निवासी संकुलाला कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आलं आहे.
बीजिंगच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राचे उपसंचालक पँग जिंगह्यो यांनी वाढत्या रुग्णसंख्येसाठी डेल्टा व्हेरिएंट जबाबदार असल्याचं सांगितलं आहे. हा व्हेरियंट 55 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी अधिक धोकादायक ठरत आहे. गेल्या 24 तासात कोरोनाचे 35 नवीन रुग्ण समोर आले आहेत. त्यापैकी चार गांसू प्रांतातील आहेत. इनर मंगोलियामध्ये 19 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. रुग्णसंख्या वाढत असल्यानं नागरिकांना घरातच राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. काही प्रांतांमध्ये बाहेरील लोकांच्या प्रवेशावर बंदी देखील घालण्यात आली आहे, अशी माहिती पँग यांनी दिली.
हे वाचा-वर्षभराने मोठा दिलासा! महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यांमध्ये एकही कोरोना रुग्ण नाही
चीनमध्ये गेल्या 24 तासात 11 प्रांतांमध्ये 133 हून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाल्यानं हा निर्णय घेण्यात आला. या सर्व रुग्णांना डेल्टा व्हेरिएंटची बाधा झाल्याचं सांगण्यात आलं आहे. कोरोनाच्या नवीन लाटेची दहशत लक्षात घेता, चीनमध्ये 3 ते 11 वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाच प्रांतातील प्रशासनानं यासंदर्भात आदेश दिले आहेत. आपल्या एकूण लोकसंख्येपैकी 76 टक्के लसीकरण झाल्याचा दावा चीननं केला आहे.
दरम्यान, कोरोना रुग्णसंख्येमध्ये वाढ झाल्यानं बीजिंग मॅरेथॉन अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. 1981 पासून दरवर्षी होणारी बीजिंग मॅरेथॉन ही चीनमधील सर्वात मोठ्या स्थानिक क्रीडा स्पर्धांपैकी एक आहे. फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या बीजिंग हिवाळी ऑलिम्पिकवर स्पर्धांच्या आयोजनाबाबत देखील अनिश्चतता आहे. या कार्यक्रमासाठी इतर देशांतील प्रेक्षकांवर आधीच बंदी घालण्यात आली आहे. ब्रिटन, रशिया आणि चीनमधील सध्याची स्थिती पाहता कोरोना पुन्हा नव्या ताकदीनिशी हल्ला करण्यासाठी सज्ज झाल्याचं दिसत आहे. त्यामुळं जगभरात पुन्हा दहशत निर्माण झाली असून शासन, प्रशासन आणि नागरिकांच्या चिंतेमध्ये वाढ झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.