मुंबई, 25 ऑक्टोबर : सोमवारी महाराष्ट्रात गेल्या 24 तासात कोरोना विषाणूचे (corona virus) 899 नवे रुग्ण आढळून आले. गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यातील रुग्णसंख्येनंतर ही सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. आज राज्यात कोविड-19 मुळे 12 जणांना आपला जीव गमवावा लागला, ज्यामुळे मृत्यूचे प्रमाण 2.12 टक्के इतके कमी झाले आहे.
सर्वात महत्त्वाची आणि दिलासा देणारी बाब म्हणजे चौदा जिल्ह्यांमध्ये कोविड-19 चा एकही रुग्ण आढळलेला नाही आणि बारा जिल्ह्यांमध्ये एकेरी संख्येत नवीन कोरोना रुग्ण नोंदवले गेले आहेत. मुंबई, ठाणे, पुणे आणि रत्नागिरी वगळता कोणत्याही जिल्ह्यात मृत्यूची नोंद झालेली नाही.
रिकव्हरी रेट 97 टक्के पेक्षा जास्त
सोमवारी एकूण 1,586 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातील रूग्णांचा रिकवरी रेट सध्या 97.47 टक्के आहे. सरकारच्या दैनिक कोविड-19 बुलेटिनमध्ये दिलेल्या माहितीनुसार सध्या 1,83,092 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत आणि 957 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
दरम्यान, कोरोना व्हायरसने (Coronavirus) पुन्हा एकदा चीन (China), रशिया (Russia) आणि ब्रिटनमध्ये (Britain) थैमान घालण्यास सुरुवात केल्याचं पहायला मिळत आहे. चीनमध्ये कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे अनेक ठिकाणी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या असून अनेक ठिकाणी शाळाही बंद करण्यात आल्या आहेत. तर तिकडे ब्रिटन आणि रशियात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने शिरकाव केला आहे. यामुळे चिंता वाढवली आहे.