जकार्ता, 02 एप्रिल : कोरोनाव्हायरस (Coronavirus) सध्या युरोप (europe) आणि अमेरिकेत (america) थैमान घालत आहे. आशिया (asia) आणि पॅसिफिक (pacific) क्षेत्र अशा परिस्थितीपासून बरंच दूर आहे. तरीदेखील सर्व देशांनी कम्युनिटी ट्रान्समिशनचा (community transmission) सामना करण्यासाठी सज्ज राहायला हवं, असा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) दिला आहे. डिसेंबर 2019 मध्ये या चीनमध्ये या व्हायरसचा उद्रेक झाला. जगभरात 7,70,000 पेक्षा जास्त प्रकरणं आहेत. चीननंतर आता यूएस, इटली, स्पेनमध्ये याचं प्रमाण भरपूर आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या वेस्टर्न पॅसिफिकचे क्षेत्रीय संचालक ताकेशी कसाई (Takeshi Kasai) म्हणाले, “आशिया आणि पॅसिफीक क्षेत्रापासून कोरोनाव्हायरसचा उद्रेक दूर असला तरीदेखील हा लढा दीर्घकाळ चालणार आहे. जोपर्यंत ही महासाथ कायम आहे तोपर्यंत कितीही उपाययोजना केल्या तरीदेखील हा धोका टळणार नाही. त्यामुळे प्रत्येक देशानं मोठ्या प्रमाणात होणाऱ्या कम्युनिटी ट्रान्समिशनसाठी तयार राहण्याची गरज आहे” हे वाचा - 10-15 वर्षांआधीच माणसांमध्ये पसरला Coronavirus, आता घेतोय जीव; धक्कादायक संशोधन “प्रत्येकाला त्यांच्या स्थानिक परिस्थितीचा सामना करायला हवा. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, कोरोनाव्हायरसशी लढण्याचा मार्ग समान नाही, मात्र काही समान उपाय आहेत. यामध्ये लोकांची माहित मिळवणे, त्यांना वेगळं करणं, त्यांची चाचणी करणे, कोरोनाव्हायरसचं निदान झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांना वेगळं करणं आणि संक्रमणाची गती कमी करणं, अशा अनेेक उपायांचा समावेश आहे”, असं त्यांनी सांगितलं. पॅसिफीक आइसलँडमधील देशांनी ही विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. कारण त्यांच्याकडे मर्यादित साधनसामुग्री आहे. व्हायरसच्या निदानासाठी दुसऱ्या देशांमध्ये त्यांना नमुने पाठवावे लागतात आणि आता वाहतुकीवर निर्बंध असल्याने ते अधिकच कठीण आहे. हे वाचा - भारतातील Coronavirus बाबत नवी माहिती समोर, तज्ज्ञ म्हणाले… काही देशांमध्ये कोरोनाव्हायरसची प्रकरणं कमी झाली, तरीदेखील त्यांनी आपलं हत्यारं खाली ठेवू नयेत नाहीतर व्हायरस पुन्हा डोकं वर वाढेल, असा इशाराही जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे टेक्निकल अॅडव्हायझर मॅथ्यू ग्रिफिथ यांनी सांगितलं, “एखादा देश कोरोनाव्हायरसपासून सुरक्षित असेल, अशी WHO अपेक्षा करत नाही. कारण कोरोनाव्हायरस कुठेही पसरू शकतो.काही देश आणि क्षेत्रांमध्ये कोरोनाव्हायरस कमी होतो आहे, मात्र त्या ठिकाणाहून इतर नवीन ठिकाणी त्याचा उद्रेक होणं चिंतेची बाब आहे. सध्या फक्त युरोपवर लक्ष केंद्रीत केलं जातं आहे, मात्र इतर क्षेत्रामध्येही त्याचा उद्रेक होऊ शकतो” हे वाचा - ‘10 सेकंद श्वास रोखलात तर तुम्हाला कोरोना नाही’, सेल्फ टेस्टबाबत Fact Check
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.