नवी दिल्ली, 15 फेब्रुवारी : देशात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण (Corona vaccination) सुरू झालं आहे. 13 फेब्रुवारीपासून लशीचा दुसरा डोसही (corona vaccine dose) देणं सुरू झालं आहे. ज्यांना कोरोना लशीचा (covid 19 vaccine) पहिला डोस मिळाला त्यांना दुसरा डोस दिला जातो आहे. पण आता दुसरा डोस देणं सुरू होताच धक्कादायक माहिती समोर आली आहे. पहिला डोस घेतलेल्या लोकांपैकी फक्त 4 टक्के लोकच कोरोना लशीचा दुसरा डोस घ्यायला आले. विशेष म्हणजे पहिला डोस घेतल्यानंतर काहींना कोरोना संक्रमण झालं आहे आणि लशीच्या दुसरा डोस घेतल्याशिवाय लशीचा प्रभावही दिसणार नाही. त्यामुळे आता मोदी सरकारची चिंता वाढली आहे. सरकारनं दिलेल्या आकडेवारीनुसार 16 जानेवारीला 1 लाख 91 हजार 181 लोकांना कोरोना लशीचा पहिला डोस देण्यात आला होता. 4 आठवड्यांनंतर म्हणजे 13 फेब्रुवारीला शनिवारी संध्याकाळी सहापर्यंत फक्त 7,668 आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. म्हणजेच दुसरा डोस घेण्यासाठी फक्त 4 टक्के लोक पोहोचले. डॉक्टरांनी सांगितलं की, लशीचा दुसरा डोस घेतल्याशिवाय त्याचा प्रभावही दिसून येणार नाही. लशीचा एक डोस घेतल्यानंतर काही लोक कोरोना संक्रमितही झाले आहेत. अशाच कोरोनाचा दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या घटली आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. हे वाचा - देशात कोरोना लस घेतलेल्या 27 जणांचा मृत्यू, काय आहे कारण? मोदी सरकार टप्प्याटप्प्यानं कोरोना लसीकरण मोहीम राबवत आहे. 30 कोटी लोकांना लस देण्याचं उद्दिष्ट आहे. त्यासाठी तीन गट तयार करण्यात आले आहेत. पहिल्या गटात एक कोटी आरोग्य कर्मचारी, दुसऱ्या गटात दोन कोटी फ्रंटलाइन वर्कर्स आणि इतर 27 कोटी 50 पेक्षा जास्त वयाच्या सर्वसामान्य नागरिकांचा समावेश आहे. ज्यामध्ये ज्येष्ठ आणि इतर आजार असलेले नागरिक असतील. हे वाचा - ऑफिसमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळल्यास करावं लागेल WFH? मंत्रालयाने जारी केले नियम पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये चार आठवड्यांचं अंतर ठेवण्यात आलं आहे. 20 फेब्रुवारीपर्यंत सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना लशीचा पहिला डोस घेणं बंधनकारक आहे. 20 फेब्रुवारीपर्यंत आरोग्य कर्मचाऱ्यांना लशीचा पहिला डोस घेता येणार आहे. यानंतर 21 ते 25 फेब्रुवारी पाच दिवस मॉप अप राऊंड होईल. म्हणजे ज्यांना कोरोना लशीचा पहिला डोस मिळाला नाही. त्यांना या पाच दिवसांत घेता येऊ शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







