नवी दिल्ली 14 फेब्रुवारी : जगभरात थैमान घातलेल्या कोरोना (Coronavirus)महामारीनं भारतातही मोठ्या प्रमाणात हातपाय पसरले. दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढत असतानाच काही दिवसांपूर्वी देशभरात कोरोना लसीकरणाला (Corona Vaccine) सुरूवात झाली. या लसीकरणामुळे नागरिकांना दिलासा मिळालेला असतानाच आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अनेकांना पहिल्या टप्प्यातील कोरोना लस देण्यात आलेली आहे मात्र यानंतर कोरोना लसीकरण केलेल्या 27 लोकांचा मृत्यू झाला आहे. या बातमीनंतर देशभरात एकच खळबळ उडाली आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, भारताच्या आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यानं या गोष्टीची माहिती दिली आहे. मात्र, मंत्रालयानं पुढे हेदेखील स्पष्ट केलं आहे, की यातील कोणाचाही मृत्यू लसीकरणामुळे झालेला नाही. शनिवारी भारताच्या आरोग्य मंत्रालयानं असंही सांगितलं, की गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोना लसीकरण केलेल्या लोकांमधील 3 जणांना मागील 24 तासात मृत्यू झाला आहे. मात्र, मंत्रालयानं पुढे हेदेखील स्पष्ट केलं, की देशात आतापर्यंत लसीकरणामुळे मृत्यू किंवा इतर काहीही गंभीर परिणाम झाल्याची एकही घटना समोर आलेली नाही.
शनिवारपासून भारतात कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यातील लस घेतल्यानंतर 28 दिवसांनी नागरिकांना दुसरी लस देण्यात येणार आहे. तर शनिवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत देशात कोरोनाच्या एकूण 80 लाख 52 हजार 454 लसींचे डोस दिले गेले आहेत. भारतात सिरम इनस्टिटूयटकडून तयार केली गेलेली ऑक्सफोर्डची लस आणि भारत बायोटेकच्या लसीचा वापर केला जात आहे.
देशात एकूण कोरोना रूग्णांची संख्या 10,880,603 इतकी आहे. अधिकृत आकडेवारीनुसार देशात कोरोनामुळे 155,447 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, जगभरात एकूण कोरोना रूग्णांची संख्या 107,778,443 पेक्षा अधिक असून 23 लाख 68 हजार लोकांनी आपला जीव गमवला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.