अलवर, 15 मे: कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेनं देशाच्या (Second Wave of Coronavirus) आरोग्य व्यवस्थेचं कंबरडं मोडलं आहे. सध्या देशात दररोज तीन लाखहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण (Corona Patients in India) आढळत आहेत. याचा प्रचंड ताण देशाच्या आरोग्य व्यवस्थेवर पडला आहे. परिणामी देशात ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शनसहित इतर वैद्यकीय सुविधांची मोठ्या प्रमाणात कमतरता जाणवत आहे. अशा संकटकाळातही अनेकजण पैशाच्या मागे धावत विविध वैद्यकीय औषधांचा काळाबाजार करत आहेत. पण एका युवकानं आपल्या मित्राच्या आईचा जीव वाचवण्यासाठी रेमडेसिवीर इंजेक्शन घेऊन दुचाकीनं तब्बल 420 किमी प्रवास केला आहे. अर्जुन बाली असं संबधित तरुणाचं नाव असून त्यानं रेमडेसिवीर इंजेक्शन घेऊन दुचाकीनं चंदीगड ते अलवर असा 420 किमीचा प्रवास अवघ्या 8 तासांत पूर्ण केला आहे. अलवर येथील रहिवासी असणारा साहिल आणि अर्जुन हे पंजाब विद्यापिठात एकत्र शिकत होते. साहिलच्या आईला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. अलवर याठिकाणी सैनिकी रुग्णालयात उपचार घेत असताना, साहिलच्या आईची ऑक्सिजन पातळी अचानक खालावली. त्यामुळे डॉक्टरांनी काही औषधं घेऊन येण्यास सांगितलं. यामध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनही आणण्यास सांगितलं होतं. अलवरमधील अनेक रुग्णालये आणि मेडिकल शॉप पालथे घातल्यानंतरही कुठेही रेमडेसिवीर इंजेक्शन मिळालं नाही. हे वाचा- 15 दिवसांनंतरही कोरोना पॉझिटिव्ह; डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेणं योग्य आहे? साहिलच्या आईची प्रकृती नाजूक असून तिला रेमडेसिवीर इंजेक्शनची आवश्यकता आहे, याची माहिती मित्र अर्जुनला समजली. यानंतर त्यानं कसलाही विचार न करता चंदीगड येथून रेमडेसिवीर इंजेक्शन शोधलं. यानंतर त्यानं आपल्या दुचाकीनं तब्बल 420 किमीचा प्रवास अवघ्या 8 तासांत पूर्ण केला. विशेष म्हणजे ‘मी रेमडेसिवीर इंजेक्शन घेऊन येतोय’, याची कल्पनाही अर्जुनने साहिलला दिली नव्हती. हे वाचा- ब्लड कॅन्सर पीडित 3 वर्षाच्या मुलाला कोरोनाची लागण; 7 दिवसांनी घडलं अनपेक्षित आपल्या मित्राच्या आईला वाचवण्यासाठी कसलाही विचार न करता, एवढ्या लांबचा प्रवास त्यानं केला आहे. त्यानं अलवरला आल्यानंतर सांगितलं की, मित्राची आई ही माझीही आई आहे. खरंतर, कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे अलवरमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुडवडा जाणवत आहे. येथील सरकारी आणि खाजगी रुग्णालयात सध्या असंख्य रुग्ण असे आहेत, ज्यांना रेमडेसिवीरची नितांत गरज आहे. पण या इंजेक्शनच्या तुटवड्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.