Home /News /career /

ज्या शहरात लिंबू पाणी विकलं तिथेच 10 वर्षांनी अधिकारी म्हणून झाली रुजू , वाचा संघर्षाची प्रेरणादायी कथा

ज्या शहरात लिंबू पाणी विकलं तिथेच 10 वर्षांनी अधिकारी म्हणून झाली रुजू , वाचा संघर्षाची प्रेरणादायी कथा

तिने आपले लांबसडक केस कापून 'बॉय कट' केला. या हेअर कटमुळे आपण बिनधास्त जगू शकलो, असं ती म्हणते.

तिरुअनंतपुरम 29 जून: आयुष्य (Life) हे खूप सुंदर असतं; फक्त त्याकडे आपल्याला तशा दृष्टीने पाहता आलं पाहिजे, असं कोण्या महान व्यक्तीनं म्हटलेलं आहे. समाजात आपल्याला दुःखामुळे रडत असलेली अनेक माणसं दिसतात; पण काही मोजकी माणसं अशीही असतात, की ती दुःखामुळे किंवा आपल्यावर ओढवलेल्या वाईट प्रसंगांमुळे रडत-कुथत बसत नाहीत, तर त्या परिस्थितीवर पाय रोवून ठामपणे उभी राहतात आणि गर्तेतून वर येतात. अशी उदाहरणं मोजकीच असली, तरी त्यांकडे पाहिल्यावर आयुष्याबद्दलचं वर पहिल्या ओळीत लिहिलेलं तत्त्वज्ञान खरं असल्याचं पटतं. असंच एक उदाहरण आहे केरळमधल्या 31 वर्षांच्या एस. पी. अॅनी या तरुणीचं. 10 वर्षांपूर्वी ती ज्या वर्काला नावाच्या शहरात लेमनेड, आइस्क्रीम (Lemonade, Ice Cream) विकायची, त्याच शहरातल्या पोलीस स्टेशनमध्ये सब-इन्स्पेक्टर (Police Sub-Inspector) म्हणून ती शनिवारी (26 जून) रुजू झाली. तिच्या आयुष्यातला हा खूप मोठा बदल कोणत्या चमत्काराने आणि आपोआप झालेला नाही. चमत्कार असलाच, तर तो तिच्या कष्टांचा, जिद्दीचा आणि परिस्थितीला शरण न जाण्याच्या वृत्तीचा. सिंगल मदर असलेल्या या तरुणीची प्रेरक कहाणी सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 'दी इंडियन एक्स्प्रेस'ने या तरुणीची मनाला उभारी देणारी गोष्ट प्रसिद्ध केली आहे. केरळच्या (Kerala) तिरुअनंतपुरम (Thiruvanathapuram) जिल्ह्यातल्या कांजिरामकुलम (Kanjiramkulam) गावात अॅनी तिच्या आई-वडिलांसह राहत असे. कॉलेजला असताना तारुण्यसुलभ भावनांमुळे ती एका तरुणाकडे आकर्षिली गेली. आई-वडिलांचा विरोध पत्करून, त्यांच्याशी बंड करून, तिने त्याच्याशी लग्नही केलं. त्यांना मूलही झालं. तिच्या आयुष्यात इथपर्यंत सगळं काही एखाद्या गोष्टीप्रमाणे सुरळीत सुरू होतं; पण दोनच वर्षांनी तिच्या या गोष्टीत दुर्दैवी ट्विस्ट आला. ज्याच्यावर विश्वास टाकून आई-वडिलांचा विरोध पत्करला, त्याच्याशी घटस्फोट घेण्यावाचून तिच्याकडे पर्याय उरला नाही; पण आई-वडिलांच्या घराचे दरवाजेही तिच्यासाठी बंद झाले होते. आई-वडिलांकडून तिला पुन्हा घरात घेण्यास नकार मिळाल्यामुळे अवघ्या आठ महिन्यांच्या मुलासह तिने आपल्या आजीच्या घरात आश्रय घेतला. तेव्हा तिचं वय होतं फक्त 21 वर्षं. दर सेकंदाला 67 लाख रुपये कमवतात Elon Musk; लहानपणीच केलेली व्यवसायाला सुरुवात ज्या वयात नव्या आयुष्याची स्वप्नं पाहायची आणि स्वप्नातल्या इमल्यांना सत्यात उतरवण्याचा प्रवास करायचा, त्या वयात तिच्यावर परिस्थिती आली उद्ध्वस्त झालेल्या संसाराला आणि आपल्या आयुष्याला सावरण्याची; पण तिने कुठेही नशिबाला किंवा आपल्या आई-वडिलांनाही दोष दिला नाही. शिक्षणच (Education) आपल्याला या परिस्थितीतून बाहेर काढू शकेल, या विचाराने तिने आपलं शिक्षण सुरू ठेवलं. ती पदवीधर झाली. एवढंच नव्हे, तर बाह्य शिक्षण घेऊन तिने पदव्युत्तर पदवीही घेतली. उदरनिर्वाहासाठी तिची धडपड सुरू होती. घरोघरी जाऊन उत्पादनांची विक्री करण्यापासून बँकेत बसून इन्शुरन्स पॉलिसी विकण्यापर्यंतचे वेगवेगळे उद्योग तिने केले. कोणी तरी तिला फेस्टिव्हल्स आणि पर्यटनस्थळी लेमनेड आणि आइस्क्रीमची विक्री केली, तर चांगला नफा होऊ शकतो, असं सुचवलं. त्याप्रमाणे तिने अंमलबजावणी केली. दरम्यानच्या काळात तिने आपले लांबसडक केस कापून 'बॉय कट' केला. या हेअर कटमुळे आपण बिनधास्त जगू शकलो, असं ती म्हणते. एका नातेवाईकाने तिला पोलीस अधिकारी बनण्यासाठी अर्ज करायला सांगितलं आणि परीक्षेसाठीच्या खर्चासाठी कर्जाऊ पैसेही दिले. तिच्या स्वप्नाला यामुळे प्रोत्साहन मिळालं. या तरुणीला मानायला पाहिजे एवढ्याचसाठी, की आई-वडिलांनी स्वीकारलं नाही, तरी तिने त्यांच्याबद्दल कोणताही आकस मनात ठेवला नाही. त्यांचं आपल्याबद्दलचं स्वप्न काय होतं, याचा तिने जगण्याच्या धडपडीत स्वतःला विसर पडू दिला नव्हता. कोरोना लसीचा पहिला डोस किती प्रभावी?, वाचा मुंबई पालिकेचं सर्वेक्षण 'मी आयपीएस अधिकारी बनावं, असं माझ्या वडिलांचं स्वप्न होतं. म्हणून मी खूप अभ्यास केला आणि पोलीस अधिकारी बनणं हेच स्वप्न उराशी बाळगलं. आयुष्यातल्या परिस्थितीवर रडत बसण्याने काहीही होत नाही. आपल्याला झेप घ्यावी लागते. आपण स्वतःला पराभूत समजेपर्यंत आपण हरत नाही,' असं आनीने एका न्यूज चॅनेलशी बोलताना सांगितलं. पोलीस दलाची परीक्षा उत्तीर्ण होऊन ती 2016मध्ये सिव्हिल पोलिस ऑफिसर (Civil Police Officer) बनली. त्यानंतर तिने सब-इन्स्पेक्टर होण्यासाठीची परीक्षा द्यायची तयारी सुरू केली. तीन वर्षांनी ती परीक्षाही ती उत्तीर्ण झाली. त्यानंतर 18 महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर 26 जून 2021 रोजी तिने प्रोबेशनरी सब इन्स्पेक्टर म्हणून वर्काला (Varkala) पोलीस स्टेशनमध्ये आपलं काम सुरू केलं. ज्या वर्काला शहरात तिने लेमनेड, आइस्क्रीम विक्री केली, त्याच शहरात आता ती ताठ मानेने पोलीस सब-इन्स्पेक्टर म्हणून वावरणार आहे. स्वतःच्या हातांनी नशीब घडवणं, असं यालाच म्हणत असावेत.
Published by:Kiran Pharate
First published:

Tags: Career, Career opportunities, Inspiration, Success stories

पुढील बातम्या