नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर: भारतीय तंत्रज्ञान संस्था अर्थात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) या शिक्षणसंस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी जॉइंट एंट्रन्स एक्झाम (JEE Advansed) द्यावी लागते. IIT JEE क्रॅक करून प्रवेश मिळवणं सोपं नाही. त्यासाठी विद्यार्थी काही वर्षं झटत असतात. पण आता International Olympiad मध्ये पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना मात्र JEE शिवाय थेट प्रवेश देण्याचा विचार सुरू आहे.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडला (International Olympiad) पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना आयआयटीमध्ये (IIT) जेईई न देता थेट प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्यातनाम असलेल्या ऑलिम्पियाडमध्ये सहभाग घेतला आहे, त्यांच्या त्या स्पर्धेतल्या कामगिरीचा विचार करून त्यांना थेट प्रवेश देण्याचा विचार आयआयटी-कानपूर (IIT-Kanpur) ही संस्था करत असल्याचं समजतं.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडमध्ये प्रवेश करणारे विद्यार्थी अत्यंत कठोर मेहनत करून तयारी करत असतात. त्यांची निवड प्रक्रियेची काठीण्यपातळीही वरची असते. पण बऱ्याचदा असे हुशार विद्यार्थी परदेशातच शिकायला जातात. हे टॅलेंट (Retaining Talent) देशातच टिकवून ठेवण्यासाठी आयआयटी-कानपूरमध्ये अशा विद्यार्थ्यांना थेट प्रवेश देण्याबाबत विचार सुरू आहे. त्यामुळे त्यांना प्रवेशाचा एक पर्याय उपलब्ध होईल. तसं झालं, तर ऑलिम्पियाडसाठी पात्र ठरलेले विद्यार्थी त्यांच्या स्पेशलाइज्ड विषयांच्या (Specialised Subjects) विभागात प्रवेशासाठी अर्ज करू शकतात. अर्थात, अद्याप याला आयआयटीमधल्या वेगवेगळ्या विभागांकडून निर्णय मंजुरी मिळालेली नाही.
आयआयटी कानपूरच्या अंडरग्रॅज्युएट अॅकेडमिक प्रोग्राम रिव्ह्यू कमिटीचे अध्यक्ष नितीन सक्सेना यांनी सांगितलं, की संस्थेने प्रवेशाच्या या दुसऱ्या मार्गाला तत्त्वतः मंजुरी दिली आहे; मात्र या विद्यार्थ्यांना अशा प्रकारे निश्चितपणे प्रवेश मिळेल, याची अद्याप खात्री देता येत नाही. या मार्गाने थेट प्रवेश घेण्याची सुविधा केवळ अत्यंत हुशार आणि पात्र विद्यार्थ्यांनाच प्राप्त व्हावी, या दृष्टीने वेगवेगळ्या गोष्टी ठरवल्या जात आहेत.
आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडला पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना बीएसस्सी मॅथेमॅटिक्स कोर्सला प्रवेश मिळण्यासाठी थेट अर्ज करण्याची सुविधा 2018 साली आयआयटी-मुंबईने (IIT Bombay) उपलब्ध करून दिली होती. सहा जागा आयआयटीने त्यासाठी राखून ठेवल्या होत्या.
ऑलिम्पियाडमध्ये विद्यार्थ्यांच्या एका ठरावीक विषयातल्या सखोल ज्ञानाची परीक्षा घेतली जाते आणि त्याआधारे मूल्यमापन केलं जातं. JEE Advanced मध्ये मात्र विद्यार्थ्यांना गणित, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या तिन्ही विषयांतल्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात. दर वर्षी जेईई मेन्सच्या रिझल्टमध्ये आघाडीवर असलेल्या पहिल्या 2.5 लाख विद्यार्थ्यांना जेईई अॅडव्हान्स्ड या परीक्षेला अर्ज करता येतो. ऑलिम्पियाडमध्ये मात्र मर्यादित विद्यार्थीच अर्ज करू शकतात.
जेईई अॅडव्हान्स्ड या परीक्षेव्यतिरिक्त GATE, CAT, CSIR NET, JAM, HSCEE, AAT यांपैकी कोणतीही प्रवेश परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन विद्यार्थ्यांना आयआयटीमध्ये प्रवेश मिळू शकतो. आयआयटीने आता ऑनलाइन कोर्सच्या माध्यमातूनही पदवी आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entrance exam, IIT