छत्तीसगड, 08 जुलै: एखाद्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी, आयुक्त अशी उच्चपदं मिळवण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक असतं. ही परीक्षा उत्तीर्ण होणं अत्यंत कठीण असतं. दरवर्षी लाखो उमेदवार ही परीक्षा देतात. त्यापैकी काही मोजके लोक यात यशस्वी होतात. त्यामुळं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास करून ही परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांचे यश अतिशय कौतुकास्पद असतं. ही परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या अनेकांना अशा उमेदवारांची यशोगाथा प्रेरणादायी ठरते. अशीच यशोगाथा लिहिली आहे नक्षलग्रस्त (Naxalite District) दंतेवाडा (Dantewada) जिल्ह्यातील नम्रता जैन यांनी. टीव्ही 9 हिंदी डॉट कॉमनं हे वृत्त दिलं आहे. छत्तीसगडमधील (Chhattisgarh) दंतेवाडा जिल्हा सर्वात मोठा नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. तिथं गोळीबार, खून, स्फोट, वीज खंडित अशा घटना रोजच्याच असतात. अशा भागातील रहिवासी असलेल्या नम्रता जैन यांनी भारतीय पोलीस सेवा आणि भारतीय प्रशासकीय सेवा अशा दोन्ही परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत. नम्रता जैन यांची आता महासमुंद इथं एसडीएमपदी (SDM) पोस्टिंग झाली असून आधी त्या रायपुर इथं प्रशिक्षणार्थी सहाय्यक जिल्हाधिकारी होत्या. नम्रता जैन यांचं प्राथमिक शिक्षण दंतेवाडा जिल्ह्यातील करली इथल्या निर्मल निकेतन शाळेत झालं. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी तिला पुढील शिक्षणासाठी बाहेरगावी पाठवण्यास नकार दिला, मात्र नम्रताच्या आईनं त्यांना पाठिंबा दिला आणि नम्रता यांना शिक्षणासाठी भिलाई इथं पाठवलं. तिथं 5 वर्षे शिक्षण घेतल्यानंतर 3 वर्षे दिल्लीत राहून UPSCची तयारी केली. याच दरम्यान, त्यांनी आयएएस अधिकारी व्हावं असं स्वप्न बघणाऱ्या त्यांच्या दोन काकांचं निधन झालं. नम्रता यांच्यासाठी हा मोठा आघात होता. यातून सावरत त्यांनी आपल्या काकांचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार केला आणि कठोर परिश्रम सुरू केले. हेही वाचा- NEET बाबत फिरणारी ‘ती’ नोटीस नकली, अफवांवर विश्वास ठेवू नका 2015 मध्ये नम्रतानं यूपीएससीची परीक्षा दिली. मात्र त्यात यश मिळालं नाही. 2016च्या परीक्षेत 99 वा रँक मिळाला तरीही त्या आयएएस अधिकारी (IAS Officer) होऊ शकल्या नाही. त्यामुळं मध्य प्रदेश केडरची आयपीएस (IPS Officer) अधिकारी झाल्या. मात्र नम्रताचे ध्येय आयएएस होण्याचे होते, त्यामुळं हैदराबादच्या सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेत असतानाही त्यांनी यूपीएससीची तयारी सुरू ठेवली आणि 2018 मध्ये पुन्हा एकदा आयएएस परीक्षेत नशीब आजमावलं. यावेळी मात्र त्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळालं आणि देशात 12 वा क्रमांक मिळविला. अखेर नम्रताचे आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण झाले. आपल्या यशाचे गमक सांगताना नम्रता जैन म्हणाल्या कि, यशापर्यंतचा आपला प्रवास पूर्ण करण्यासाठी संयम अतिशय महत्त्वाचा असतो. कधी चुका होतील, पहिल्याच फटक्यात यश मिळणार नाही, अशावेळी तुम्ही हिंमत हारू नका. धैर्यानं परिस्थितीचा सामना करा. शेवटी यश तुमच्या हातात येईल, हे नक्की. हेही वाचा- वर्षभरात स्टार्टअप कंपनीची 100 कोटींची कमाई; सरकारच्या मदतीने तुम्हीही सुरू करा हा Online व्यवसाय आपलं ध्येय साध्य करण्यासाठी अपयशानं खचून न जाता अथक परिश्रम घेऊन यशाला गवसणी घालणाऱ्या नम्रता जैन या ‘कोशिश करनेवालोंकी हार नही होती’ या उक्तीचं सार्थ उदाहरण आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.