Home /News /career /

मजुरी करण्यात गेलं बालपण, IAS अधिकाऱ्याने दिला मदतीचा हात; आज घेतोय प्रसिद्ध कॉलेजमध्ये शिक्षण

मजुरी करण्यात गेलं बालपण, IAS अधिकाऱ्याने दिला मदतीचा हात; आज घेतोय प्रसिद्ध कॉलेजमध्ये शिक्षण

कौटुंबिक परिस्थिती हलाखीची असतानाही आपण शिक्षण घेतलंच पाहिजे, असा ध्यास मनाशी बाळगत या मुलानं रात्रंदिवस मेहनत केली. त्याची ही मेहनत आणि शिक्षणाप्रति असणारं प्रेम एका सनदी अधिकाऱ्याच्या चाणाक्ष नजरेनं टिपलं.

चेन्नई, 17 सप्टेंबर: प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षण घेऊन प्रगती करणाऱ्या व्यक्ती समाजासाठी प्रेरणादायी असतात. आर्थिक स्थिती हलाखीची असताना, कठोर परिश्रम करून शिक्षण घेऊन उच्च पदावर पोहोचलेली अनेक माणसं आपण समाजात पाहतो. खरं तर त्याचं संपूर्ण जीवन अन्य लोकांसाठी प्रेरणास्रोत असतं. अशीच काहीशी गोष्ट एका मुलाच्या जीवनात घडली. कौटुंबिक परिस्थिती हलाखीची असतानाही आपण शिक्षण घेतलंच पाहिजे, असा ध्यास मनाशी बाळगत या मुलानं रात्रंदिवस मेहनत केली. त्याची ही मेहनत आणि शिक्षणाप्रति असणारं प्रेम एका सनदी अधिकाऱ्याच्या चाणाक्ष नजरेनं टिपलं. या मुलाला त्या सनदी अधिकाऱ्यानं मदतीचा हात दिला आणि मजुरी करणाऱ्या या मुलाचं आयुष्य बदलून गेलं. या मदतीमुळे आज हा मुलगा एका प्रसिद्ध कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. मालेश बाडरप्पा (Malesh Badrappa) आज मद्रास ख्रिश्चन कॉलेजमध्ये सोशल वर्क (Social Work studies) या विषयात पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण करत आहे. हे चेन्नईमधलं प्रसिद्ध महाविद्यालय आहे. खरं तर मालेशचं बालपण खूपच खडतर होतं. `माझं सुरुवातीचं शिक्षण तमिळ (Tamil) भाषेतून झालं. आता मी इंग्रजी माध्यमात शिकत आहे. माझ्यासाठी हे कठीण होतं. परंतु मी हार मानली नाही. आयएएस बनण्याचं माझं स्वप्न आहे. तसंच जी मुलं परिस्थितीमुळं शिक्षण घेऊ शकत नाहीत, अशा मुलांना मदत करायची माझी इच्छा आहे,` असं मालेशनं एका मुलाखतीत सांगितलं. हे वाचा-ZP Gondia Recruitment: आरोग्य विभाग गोंदिया इथे 24,000 रुपये पगाराची नोकरी मालेशच्या जन्मानंतर दोन आठवड्यांनी त्याच्या आईचं निधन झालं. त्यानंतर पाच महिन्यांनी वडिलांचा मृत्यू झाला. आपल्या आई-वडिलांच्या मृत्यूला मालेशच जबाबदार आहे, असं त्याच्या बहीण-भावांचं म्हणणं होतं. ते त्याला अपशकुनी मानत. ज्या वयात मुलं आपला बहुतांश वेळ खेळण्या-बागडण्यात घालवतात, त्या वयात मालेश शेतमजूर म्हणून काम करू लागला. म्हशींना चरायला नेण्याचं काम तो करत असे. त्यानंतर तमिळनाडूतल्या कृष्णागिरी इथल्या एका शेतात तो फुलं तोडणीचं काम करू लागला. त्या ठिकाणी त्याला पोटभर जेवणदेखील मिळत नसे. कधीकधी नाचणीचं सार आणि भाज्या असं जेवण त्याला मिळत होतं; मात्र सात वर्षांनंतर मालेशचा दिनक्रम बदलला. मालेश आजही सकाळी लवकर उठतो. आपल्या मित्रांकडून इंग्रजी शिकतो, ऑनलाइन क्लास घेतो आणि जेवण स्वतः बनवतो. मालेशचा हा दिनक्रम आता ठरलेला आहे. एका ऑनलाइन पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत मालेशनं सांगितलं, 'मी माझ्या मोठ्या भावासोबत राहत होतो. तो मला एका शेतात घेऊन जाई आणि तिथे कामं करायला सांगे. त्या शेतातच माझ्या बालपणाला सुरुवात झाली. मी त्या शेतकऱ्याच्या घराशेजारच्या एका छोट्याशा जागेत राहू लागलो. माझा भाऊ दिवसभरात फक्त 5 मिनिटं मला भेटायला येई. त्या वेळी माझ्या मालकाला भेटून माझा पगार त्याच्याकडून घेऊन जाई. त्यानं मला शिक्षणासाठी कधीही पैसे दिले नाहीत. मालकाच्या दोन्ही मुली शाळेत जात. हे पाहून 'मला पण शाळेत पाठवता का' अशी विचारणा मालकाकडे केली असता त्यांनी त्यास नकार दिला. दररोज सकाळी लवकर उठून मी गायी चरायला घेऊन जाई. तेथून आल्यानंतर गायींचं दूध काढावं लागे. त्यानंतर मी टोमॅटोच्या शेतात कामाला जाई. गुलाबाच्या शेतीला, तसंच हंगामी भाजीपाला पिकांना पाणी देण्याचं काम करावं लागे,' असं मालेशनं सांगितलं. हे वाचा-खुशखबर! AICTE आणि Microsoft झाले पार्टनर; विद्यार्थ्यांना देणार इंटर्नशिप्स 'मी 10 -12 वर्षांचा असताना माझ्या भावानं मला अजून एका शेतात कामासाठी नेलं. तिथला मालक मला वाईट वागणूक देत असे. अनेकदा प्रमाणापेक्षा अधिक काम केल्यानं माझ्या हातातून रक्त येत असे. परंतु, अशा स्थितीतही मला काम करावं लागत असे,' असं मालेशनं सांगितलं. तो पुढे म्हणाला की, 'याच दरम्यान एक घटना घडली आणि माझं आयुष्य बदलून गेलं. मी ज्या शेतात काम करत होतो. त्या शेताला काही अपरिचित व्यक्तींनी वेढा घातला. त्या शेतात बालमजूर काम करत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्या वेळी आमचा मालक तेथे उपस्थित नव्हता. परंतु, बाकीची मुलं मजुरीचं काम करत होती. ज्या पालकांनी त्या मालकाकडून कर्ज घेतलं आहे, अशा पालकांची मुलं तिथं मजुरीचं काम करत होती. कर्जाच्या बदल्यात या मुलांकडून जबरदस्तीनं मजुरी करून घेतली जात होती. या वेळी माझ्यासह 15 मुलांना तेथून सोडवण्यात आलं. हा प्रकार 2013 मध्ये घडला. त्याच वेळी मला आयएएस (IAS) अधिकारी परवीन पी. नायर यांनी मदत केली. ही धाड पडली तेव्हा एका अनोळखी व्यक्तीनं मला जवळ बोलावून माझी वैयक्तिक माहिती विचारली आणि मला अधिकाऱ्यांसमोर उभं केलं.' या शेतात लहान मुलांकडून कामं करून घेतली जात असल्याची माहिती मिळाल्यानं प्रशासनानं त्या ठिकाणी धाड टाकल्याचं नायर यांनी सांगितलं. या घटनेनंतर सर्व मुलांना सरकारी शाळेत शिक्षणासाठी भरती केलं गेलं. आमची सोय वसतिगृहात करण्यात आली. त्यानंतर संबंधित शेतमालकावर कायदेशीर कारवाई करण्यात आली. परंतु, मालेशच्या अडचणी इथंच संपल्या नाहीत. शाळेतल्या शिक्षकांनीही त्याला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. इयत्ता आठवीनंतर तो कृष्णागिरीतल्या रायाकोटाई विद्यालयात शिफ्ट झाला. तिथल्या शिक्षकांनी चांगलं प्रोत्साहन देऊन मदत केल्याचं मालेशनं सांगितलं. योग्य वेळी मिळालेली मदत आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर मालेश आपलं आयुष्य घडवत असून, त्याची वाटचाल अन्य मुलांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.
First published:

Tags: Career, Ias officer

पुढील बातम्या