मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

MPSC साठी भूगोल विषयाची तयारी कशी करावी?

MPSC साठी भूगोल विषयाची तयारी कशी करावी?

MPSC परीक्षेचा अभ्यास करण्याच्या टिप्स

MPSC परीक्षेचा अभ्यास करण्याच्या टिप्स

कोणत्याही स्पर्धा परीक्षांचा (MPSC, UPSC) अभ्यास करताना भूगोलाचा अभ्यास (Geography Study) करणे आवश्यक आहे. भूगोलाचा अभ्यास करताना काही नियम पाळणे आवश्यक आहे.

  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 23 डिसेंबर : राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या (MPSC) अभ्यासाला सुरुवात करण्यावेळी अनेकांना प्रश्न पडतो की आधी इतिहासाचा अभ्यास करावा की भूगोलाचा? खरंतर कोणताही आधी केला तरी चालेल. मात्र, जर तुम्ही आधी भूगोलाचा अभ्यास (Geography Study) केला तर इतिहासातील (history) कोणती घटना कुठे घडली? हे लक्षात ठेवायला सोपं जाईल. भूगोल या विषयाचा अभ्यासाला सुरुवात कशी करावी? आधी काय करायला हवे? या सर्वा गोष्टी आपण सविस्तर जाणून घेऊयात.

लक्षात ठेवा स्पर्धा परीक्षांच्या कोणत्या विषयाचा अभ्यास सुरू करताना थेट पुस्तकं हातात घेऊ नका. सर्वात आधी प्रश्नसंचाचा अभ्यास करा. प्रश्नांच्या पटर्नवरुन आपल्याला अभ्याक्रमाची माहिती होते. भूगोलातील कोणत्या मुद्द्यांवर अधिक प्रश्न विचारलेत? कशावर कमी भर आहे, हे सविस्तर लिहून काढा. म्हणजे आता तुम्हाला अभ्यास कसा करायचा? काय वाचायला हवे? याविषयी स्पष्टता आलेली असेल.

भूगोलाचा अभ्यासक्रम

या घटकाचा अभ्यासक्रम भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह) पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी असा देण्यात आला आहे. मागील प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणावरून आर्थिक भूगोलातील नसर्गिक साधनसंपत्ती, खनिजे, ऊर्जा स्रोत, पायाभूत सुविधा, भारताचा प्राकृतिक भूगोल, मानवी भूगोल आणि राजकीय भूगोल हे मुद्दे अभ्यासामध्ये समाविष्ट असणे आवश्यक असल्याचे दिसते.

तयारी कशी करावी?

पृथ्वी, अक्षांश-रेखांश, जगातील विभाग यांचा अभ्यास एकत्रितपणे करायला हवा. पृथ्वीची रचना, पृथ्वीचा आस आणि त्याचे कलणे, अक्षांश, रेखांश, पृथ्वीच्या परिवलनामुळे निर्माण झालेल्या पृथ्वीच्या विशिष्ट स्थिती, वातावरण, हवामानाचे घटक, मान्सूनची निर्मिती, मान्सूनवर परिणाम करणारे घटक, वाऱ्यांची निर्मिती, भूरूप निर्मिती, भूकंप, वादळांची निर्मिती, प्रमाण वेळ अशा मूळ संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे. या घटकांचा दिलेल्या क्रमाने समजून घेत अभ्यास करणे फायद्याचे ठरेल.

पूर्णवेळ नोकरी करुन UPSC, MPSC मध्ये यश मिळवता येतं! सांगतायेत देशात 28 वी रँक मिळवलेल्या IAS

ज्वालामुखी, पर्वतरांगा, वारा, नदी, सागरी प्रवाह, समुद्रलाटा, हिमनद्या यांच्याद्वारे निर्मित भूरूपे या गोष्टी नीट समजून घ्याव्यात. मृदा, हवामान, वने, बंदरे, स्थानिक वारे, विविध आखाते, सामुद्रधुनी आणि महासागर, हवामान प्रदेश, नद्या, वाळवंटे, पर्वतरांगा, पठारे या घटकांचा नकाशा समोर ठेवून अभ्यास करावा. त्यामुळे फोटोग्राफिक मेमरीचा वापर होऊन तो व्यवस्थित लक्षात राहतो. या सर्वांचा अभ्यास करताना याच्या नोट्स काढायला विसरू नका. तुलानात्मक अभ्यासही जास्त लक्षात राहतो.

देशासह महाराष्ट्रातील हवामान, पर्जन्यमान म्हणजेच भारतीय मान्सून आणि भारताचा प्राकृतिक भूगोल यांचा अभ्यास एकत्रित करायला हवा. यातील भारताच्या प्राकृतिक भूगोलामध्ये नदीप्रणाली, पर्वतप्रणाली, हवामान प्रदेश, वनांचे प्रकार, खडकांचे व मृदेचे प्रकार यांचा आढावा नकाशाच्या आधारे घ्यायला हवा.

नदीप्रणाली, पर्वतप्रणाली यांचा उत्तर-दक्षिण व पूर्व-पश्चिम क्रम लक्षात ठेवावा. विशेषत: महाराष्ट्रातील नद्या त्यांची खोरी व पर्वतरांगा यांचा एकत्रित अभ्यास केल्यास जास्त मदत होईल. महाराष्ट्राच्या पश्चिम वाहिनी नद्यांचा क्रम, घाटांचा क्रम लक्षात ठेवावा. पश्चिम वाहिनी नद्यांच्या महत्त्वाच्या खाड्यांची नावे लिहून ठेवायला हवीत.

..तर तुम्हीही MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा क्रॅक करू शकता, कशी करावी तयारी?

मानवी भूगोलामध्ये वेगवेगळ्या जागतिक प्रदेशांमधील महत्त्वाच्या जमातींचा अभ्यास येतो. तसेच महाराष्ट्रातील आदीम जमाती, देशातील महत्त्वाच्या आदीम जमाती व त्यांचे भूप्रदेश, त्यांच्या शेतीचे प्रकार, चर्तेत असल्यास त्यांच्याबाबतचे महत्त्वपूर्ण मुद्दे यांचा आढावाही घेणे आवश्यक आहे.

पायाभूत सुविधांचा आढावा घेताना महत्त्वाचे महामार्ग, विकसित बंदरे, व्यापारी बंदरे, लोहमार्ग यांचा आढावा घ्यायला हवा.

आर्थिक भूगोलामध्ये महत्त्वाची खनिजे व त्यांचे स्रोत खडक आणि मुख्य उत्पादक जिल्हे/राज्ये, महत्त्वाची पर्यटनस्थळे, धबधबे, धार्मिक स्थळे, जिल्ह्याची मुख्य केंद्रे, उद्योगांची मुख्य स्थाने, महत्त्वाच्या शहरांची वैशिष्ट्ये व त्यांची टोपणनावे, ती नदीकिनारी असल्यास संबंधित नद्या यांच्या नोट्स काढा.

कॉलेजला असताना MPSC चा अभ्यास कसा करायचा?

पशुधन, कृषीचे प्रकार, मासेमारी, वने, प्रमुख पिके यात नगदी व अन्नधान्य त्यांचे वितरण, कृषी क्षेत्रातील विविध क्रांती याचाही अभ्यास हवा.

भारताचा व महाराष्ट्राचा राजकीय भूगोल पाहताना राज्यांचे आकार, जिल्ह्याचे आकार, भूवेष्टित, किनारी राज्ये/जिल्हे, सीमारेषेवरील राज्ये/जिल्हे यांचा नकाशा समोर ठेवून अभ्यास करावा.

सध्या बाजारात सगळ्या प्रकारचे नकाशे उपलब्ध आहेत. नकाशात भौगोलिकपासून राजकीय बाबींचा समावेश असलेले सर्व प्रकारचे नकाशे विकत घ्या. नकाशामुळे तुम्हाला गोष्टी लक्षात ठेवायला मदत होते.

First published:

Tags: Exam, Mpsc examination