सुमीत सोनवणे, (प्रतिनिधी)
दौंड, 29 जुलै: यश मिळविण्यासाठी आर्थिक परिस्थिती नाही तर जिद्द, चिकाटी, आत्मविश्वासाची गरज असते. हे दहावीत शिकणाऱ्या साक्षी शिंदे या विद्यार्थिनीनं दाखवून दिलं आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये कुरकुंभ येथील श्री फिरंगाईमाता विद्यालयातील साक्षी शिंदे ही दहावीच्या परीक्षेत 97.00 टक्के मिळवित विद्यालयात पहिली आली आहे. साक्षीचे वडील कुरकुंभ येथील पेट्रोल पंपावर काम करतात तर आई अंगणवाडीमध्ये काम करते.
हेही वाचा...'एलिझाबेथ एकादशी'मधल्या झेंडूला गणितात मिळाले चक्क 100 पैकी 42 नव्हे 96 गुण
साक्षीची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून कुरकुंभ येथे घर सोडलं तर काहीच स्थावर मालमत्ता नाही. काम केले तरच घरचा उदरनिर्वाह चालतो. साक्षीची घरची परिस्थिती बेताची असल्याने ती शाळेतून घरी गेल्यावर आईला घर कामात मदत करत असे. दोन्ही मुलीच असल्याने मुलाची उणीव साक्षीनं कधीही आई वडिलांना भासू दिली नाही. मुलगी ही घराचे नावलौकीक करू शकते, हे तिनं दाखवून दिलं आहे. हलाखीच्या परिस्थितीत दहावीत 97.00 टक्के मिळवीत विद्यालयाचे, गावाचे नावलौकिक केले आहे. एकीकडे सर्व सोयी-सुविधा घेऊन शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि पालकांनी याकडे आवर्जून लक्ष दिले पाहिजे.
हेही वाचा...अकरावीत पसंतीचं कॉलेज मिळणं होऊ शकतं अवघड, 90s club ची स्पर्धा वाढली
परिस्थितीशी सामना करीत चांगली गुणवत्ता समजापुढे ठेवणाऱ्या या विद्यार्थिनीचं गावकऱ्यांकडूनही कौतुक होत आहे.या उत्कृष्ट कामगिरी बद्दल उत्कर्ष शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष केशवराव शितोळे, कार्याध्यक्ष अनिल शितोळे,सचिव सचिन शितोळे, प्राचार्य नानासाहेब भापकर, कुरकुंभचे सरपंच राहुल भोसले, पोलीस पाटील रेश्मा शितोळे, ग्रामसेवक विनोद शितोळे, पर्यवेक्षक सिकंदर शेख, संस्थेचे संचालक मंडळ, शिक्षक वृंद ग्रामस्थ यांच्याकडून साक्षीचे कौतुक होत आहे.