पुणे, 29 जुलै : महाराष्ट्र बोर्डाचा SSC 2020 परीक्षेचा निकाल (MSBSHSE SSC Result) दुपारी 1 वाजता जाहीर झाला. तो आतापर्यंत बहुतेक विद्यार्थ्यांनी पाहिला असेल. अनेकांना 90 टक्क्यांपेक्षा अधिक मार्क मिळाल्याने आनंदही झाला असेल. पण एवढे गुण मिळवूनही आपल्या पसंतीचं कॉलेज मिळवण्यात या वर्षी अडचण येऊ शकते. कारण या वर्षीच्या निकालाचं वैशिष्ट्य पाहता 90 टक्क्यांच्या वर गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत तिप्पट झाली आहे.
83,262 विद्यार्थ्यांना या वर्षी 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. गेल्या वर्षी हीच संख्या 28516 होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या अंदाजाने किती टक्के गुणांना पसंतीचं कॉलेज असा विचार करत असाल, तर थोडे सावध व्हा. 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळवणारे सर्वाधिक विद्यार्थी पुणे विभागातले आहेत. 15466 विद्यार्थ्यांना 90 हून अधिक टक्के आहेत. मुंबई विभागातही 14756 विद्यार्थी या 90 क्लबचे सदस्य झाले आहेत. म्हणजेच सर्वाधिक लोकप्रिय महाविद्यालयं जिथे प्रवेशासाठी तुंबळ स्पर्धा आहे, तिथली स्पर्धा यंदा आणखी तीव्र होणार आहे. अर्ध्या आणि पाव टक्क्यांनी पसंतीच्या कॉलेजची अॅडमिशन गेली, असंही होण्याची शक्यता आहे.
दहावीचा निकाल इथे डाऊनलोड करा.
प्रत्येक विभागात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 90 क्लबचे सदस्य वाढले आहेत. सर्वाधिक वाढ कोकण विभागात दिसते.
हे वाचा - निकाल ते गुणपडताळणीपर्यंत सर्व प्रक्रिया Online, 4 पद्धतीनं भरता येणार शुल्क
90 टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची विभागवार संख्या
15 वर्षांतला सर्वोत्तम निकाल
यंदाचा निकाल मागच्या 15 वर्षातला सर्वात उत्तम निकाल असल्याचं बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी सांगितलं. राज्याचा एकूण निकाल 95.30 टक्के लागला असून कोकण विभाग अव्वल आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलांपेक्षा 3 टक्के जास्त विद्यार्थिनींचा निकाल लागला आहे.
या वर्षीचा निकाल 18 टक्क्यांनी वाढला आहे. सर्वात विशेष बाब म्हणजे 15 लाख विद्यार्थ्यांमधून 242 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले आहेत. राज्यातील 8360 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. राज्यात 60 विषयांपैकी 20 विषयांचा निकाल 100 टक्के लागला असल्याची माहिती बोर्डानं दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.