नवी दिल्ली, 27 जानेवारी : देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक यूपीएससी परिक्षेत लाखो उमेदवार दरवर्षी जीवतोड मेहनत करुन परीक्षा देत असतात. मात्र, खूप कमी जण या परिक्षेत पास होत असतात. आज अशाच एका यशस्वी तरुणीचा प्रवास आपण जाणून घेणार आहोत. IAS तपस्या परिहार या मध्य प्रदेशातील रहिवासी आहेत.
कायद्याचे शिक्षण घेत असतानाच त्यांनी यूपीएससीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला होता. 2021 मध्ये, त्यांनी IFS गरवित गंगवार यांच्यासोबत लग्न केल्यानंतर त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या होत्या. यूपीएससी परीक्षेच्या तयारीदरम्यान तपस्या परिहारच्या कुटुंबीयांनी त्यांना खूप पाठिंबा दिला. आज जाणून घेऊयात, त्यांचा यशस्वी प्रवास.
तपस्या परिहारचे सुरुवातीचे शिक्षण नरसिंगपूरच्या केंद्रीय विद्यालयातून झाले. यानंतर त्यांनी पुण्यातील इंडिया लॉ सोसायटीच्या लॉ स्कूलमध्ये प्रवेश घेतला. कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षेला बसण्याचा निर्णय घेतला होता. तपस्या परिहारने पहिल्या प्रयत्नात कोचिंगची मदत घेतली. पण यावेळी त्यांना यश मिळाले नव्हते.
यूपीएससी परीक्षेच्या तयारीदरम्यान तपस्याच्या कुटुंबीयांनी तिला खूप पाठिंबा दिला. तपस्याचे काका विनायक परिहार हे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी तपस्या यांना यूपीएससी परीक्षेच्या तयारीदरम्यान खूप पाठिंबा दिला. तपस्या यांची आजी देवकुंवर परिहार या नरसिंगपूर जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षा आहेत. त्यांच्या पहिल्या अपयशातून शिकत, तपस्या परिहारने दुसऱ्या प्रयत्नात सेल्फ स्टडी आणि नोट्स बनवण्यावर लक्ष केंद्रित केले.
हेही वाचा - Success Story : पाणीपुरी विकून मुलाला बनवले पायलट, रविकांतचा संघर्षमय प्रवास प्रेरणादायी!
दुसऱ्या प्रयत्नाच्या तयारीदरम्यान तपस्या परिहार यांनी उजळणीवर लक्ष केंद्रित केले होते. त्यांच्या मेहनतीमुळे त्यांनी 2017 मध्ये यूपीएससी परीक्षेत अखिल भारतीय स्तरावर 23 वा क्रमांक मिळविला. यामध्ये त्यांनी मॉक टेस्ट आणि उत्तर लेखनाचा भरपूर सराव केला होता.
दरम्यान, IAS तपस्या परिहार यांनी 2021 मध्ये IFS गरवित गंगवारशी लग्न केले. लग्नादरम्यान, जेव्हा कन्यादान विधी करण्यासाठी तिचे वडील आले तेव्हा त्यांनी नकार दिला होता आणि तिच्या वडिलांना सांगितले की, ती दान करण्याची वस्तू नसून त्यांची मुलगी आहे. त्यांच्या कुटुंबीयांसह वराच्या बाजूच्या लोकांनीही कन्यादान न करताही लग्न होऊ शकते हे मान्य केले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, Ias officer, Inspiring story, Upsc, Upsc exam