नवी दिल्ली, 22 जानेवारी : निम्न मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलासाठी पायलट होण्याचे स्वप्न पाहणे ही मोठी गोष्ट आहे. एखाद्याने जर मनाशी ठरवलं तर कुठलाही अडथळा तुमच्या मार्गात येऊ शकत नाही. आणि असंच काही जण आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रचंड मेहनत करतात आणि आपलं स्वप्न पूर्ण करुन दाखवतात. एका तरुणाचा प्रवास असाच अत्यंत प्रेरणादायी राहिला आहे.
ही प्रेरणादायी कहाणी आहे मध्य प्रदेशातील नीमच जिल्ह्यात राहणाऱ्या रविकांत चौधरी या तरुणाची. एखाद्याने जर मनाशी ठरवलं तर कुठलाही अडथळा तुमच्या मार्गात येऊ शकत नाही, हे या तरुणाने सिद्ध करुन दाखवलं आहे.
रविकांतचे वडील पाणीपुरी विकतात. रविकांत स्वत: त्यांना या धद्यामध्ये मदत करायचा. सर्व कठीण परिस्थितीशी झुंज देऊनही त्याने आपल्या स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द सोडली नाही. अनेक अपयशानंतरही त्यांनी मेहनत सुरूच ठेवली. एनडीएची परीक्षा उत्तीर्ण होऊन हवाई दलात लढाऊ विमान उडवण्याचे स्वप्न त्याने अखेर पूर्ण केले आहे.
पाणीपुरीच्या गाडीने सुरुवात केली -
मनासा शहरातील द्वारकापुरी धर्मशाळेजवळ देवेंद्र चौधरी हे अनेक वर्षांपासून पाणीपुरी विकत आहेत. वर्षानुवर्षे हेच त्यांच्या कुटुंबाचे उदरनिर्वाहाचे साधन आहे. देवेंद्र यांचा मुलगा रविकांत अभ्यासासोबत पाणीपुरी विकण्यातही वडिलांना मदत करतो. रविकांतला हवाई दलात फ्लाइंग ऑफिसर व्हायचे होते. खूप मेहनत आणि वर्षानुवर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर रविकांतने त्याचे स्वप्न पूर्ण केले आहे.
हेही वाचा - वडिलांसोबत शेती करणारा रवी झाला IAS, भन्नाट आहे त्याची जर्नी
प्रशिक्षणाशिवाय यशस्वी -
रविकांत याच्याकडे कोचिंगमध्ये सहभागी होण्यासाठी पैसे नव्हते. त्याने स्वतः इंटरनेटच्या मदतीने परीक्षेची तयारी केली. जिल्ह्यात असलेल्या सीआरपीएफ प्रशिक्षण केंद्रातील जवानांना पाहून त्याला त्यांच्यासारखे बनण्याचे स्वप्न पडायचे. तो विविध परीक्षांची माहिती गोळा करत राहिला आणि 4 वर्षांच्या मेहनतीनंतर हवाई दलात फ्लाइंग ऑफिसर झाला.
हैदराबाद येथील प्रशिक्षण केंद्रातून रविकांत चौधरी यांचे पत्र त्यांच्या घरी पोहोचले आहे. तेव्हापासून त्यांचे अभिनंदन करणाऱ्यांची झुंबड उडाली होती. प्रत्येकजण त्याच्या जिद्द आणि मेहनतीचे कौतुक करत आहे. 12वी बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने एनडीए परीक्षेची तयारी सुरू केली. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याने त्याच्या अपयशाची भीती बाळगली नाही. त्याचा हा प्रवास तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, Inspiring story, Success story