नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या प्रॅक्टिकल परीक्षांची तारीख जाहीर केली आहे. 1 मार्च ते 11 जून दरम्यान आता या परीक्षा घेण्यात येतील. याबाबत मंडळाकडून सर्व शाळांना परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. या पत्रकाप्रमाणे, सर्व शाळांना 11 जून पर्यंत प्रकल्पाचे गुण आणि अंतर्गत मूल्यांकन पूर्ण करायचं आहे. त्याचबरोबर सर्व शाळांना शक्य तितक्या लवकर प्रॅक्टिकल परीक्षांचे गुण हे मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर देखील अपलोड करायचे आहेत. तसेच कोरोनाची गंभीर परिस्थिती आणि विद्यार्थांची सुरक्षा लक्षात घेऊन मंडळाने या परीक्षेसाठी काही सूचना देखील शाळांना दिल्या आहेत.
प्रॅक्टिकल परीक्षेसंबंधी काही महत्वाच्या सूचना:
- दहावी आणि बारावीच्या विविध विषयांच्या प्रॅक्टिकल परीक्षा या जास्तीत जास्त 20 गुणांच्या घेतल्या जातील. तसेच एनसीसीसाठी जास्तीत जास्त गुण 30 आहेत. दहावी आणि बारावीच्या मुख्य परीक्षा मेपासून सुरू होणार असून सर्व परीक्षा 10 जूनपर्यंत संपणार आहेत.
- शाळेला आपल्या सर्व विद्यार्थ्यांची माहिती ही बोर्डच्या प्रादेशिक कार्यालयात देण्याचे सांगितले गेले आहे. जेणेकरून प्रॅक्टिकल परीक्षेसाठी बाहेरून परीक्षक नेमता येतील.
- कोणत्याही परिस्थितीत शाळांना अंतर्गत परीक्षकांसह प्रॅक्टिकल परीक्षा घेण्याची परवानगी नाही. जर असं करण्यात आलं तर विद्यार्थ्यांचे प्रॅक्टिकल परीक्षांचे गुण हे रद्द करण्यात येतील आणि त्यांना लेखी परीक्षेच्या आधारावर सरासरी गुण देण्यात येतील.
- ज्या विद्यार्थ्यांची प्रॅक्टिकल परीक्षा घेण्यात येईल त्यांचे गुण हे त्वरित एका ग्रुप फोटोसह शाळेने अपलोड करायचे आहेत आणि गैरहजर असलेल्या विद्यार्थ्यांसहित सगळे गुण हे 1 मार्च ते 11 जून पर्यंत अपलोड करायचे आहेत.
सुरक्षेविषयी काही महत्वाच्या सूचना :
- दहावी आणि बारावीच्या प्रत्येक बॅचच्या प्रॅक्टिकल परीक्षेनंतर प्रयोगशाळा ही सोडियम हायपोक्लोराइटने स्वच्छ केली पाहिजे.
- सर्व लॅबमध्ये सॅनिटायझर्स असावेत.
- सर्व लॅबमध्ये डस्टबिन असले पाहिजेत आणि त्यांची वेळेची स्वच्छता होणे आवश्यक आहे.
(हे देखील वाचा - IBPS RRB PO 2020: मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, इथे पाहा निकाल)
- सर्व विद्यार्थ्यांसाठी मास्क लावणे आणि सुरक्षित अंतर पाळणे हे बंधनकारक असेल.
- सोशल डिस्टंसिंग पाळण्यासाठी 25 मुलांच्या बॅचची दोन गटात विभागणी करून प्रॅक्टिकल परीक्षा घेता येऊ शकते.
- जर एखाद्या शाळेने हे सुरक्षेचे नियम पाळले नाहीत तर त्यांना 50 हजारांचा दंड होऊ शकतो.