मुंबई, 15 फेब्रुवारी : अवघ्या दोन दिवसांनी महाराष्ट्र बोर्डाची बारावीची परीक्षा सुरु होत आहे. तर 03 मार्च ते 23 मार्चपर्यंत दहावीची परीक्षा होणार आहे. परीक्षागृहात विद्यार्थ्यांनी जाण्याआधी काही नियम पाळणं अपेक्षित आहे. त्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांनी काही नियम लक्षात घेणं आवश्यक आहे. जे परीक्षेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे आहेत. ह्या नियमांचं उल्लंघन केल्यास परीक्षेला बसण्यासाठी दिलं जाणार नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी विद्यार्थी आणि पालकांनीही काळजी घेणं आवश्यक आहे.
परीक्षा केंद्रावर जाण्याआधी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात
परीक्षा केंद्र- आपलं परीक्षा केंद्र कोणतं आहे, वर्ग क्रमांक कोणता आहे आणि कोणता पेपर आज आहे या सगळ्याची तपासणी करणं आवश्यक आहे. एकाच दिवशी अनेक विषयांचे पेपर असल्यानं अनेकदा गोंधळ होतो. अशावेळी परीक्षा गृहात जाण्याआधी 15 मिनिटं परीक्षा केंद्रावर लवकर पोहोचून या सर्व गोष्टी तपासणं आवश्यक आहे. जर परीक्षा केंद्रावर काही आपल्या आसन क्रमांकाची गडबड असेल तर तातडीनं शिक्षकांपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे.
यूनिफॉर्म- काही कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ड्रेस कोड आहेत. तर काहींना नाहीत. शाळांना मात्र यूनिफॉर्म कंपल्सरी आहे. परीक्षा केंद्रावर यूनिफॉर्ममध्ये येणं बंधनकारक आहे. यासोबत आपलं हॉल तिकीट आणि शाळेचं आयडीही सोबत असायला हवं.
हेही वाचा-Board Exam : परीक्षेला बसल्यानंतर तुम्हाला काहीच आठवलं नाही तर काय कराल?
वेळ- परीक्षेत सर्वात महत्त्वाची असते ती वेळ. बऱ्याचदा परीक्षा केंद्रावर उशिरा पोहोचल्यानं पेपर राहिला किंवा पेपरला बसू दिलं नाही अशा तक्रारी समोर येतात. यासाठी पूर्व नियोजन करून वेळेआधी 15 ते 20 मिनिटं लवकर परीक्षा केंद्रावर पोहोचावं. जर आपला पेपर 10 वाजता असेल तर आपण 9.40 पर्यंत पोहोचणं अपेक्षित आहे.
आहार- परीक्षेला जाण्याआधी घरातून निघताना पोटभर खाऊन निघावं. सोबत पाण्याची बाटली ठेवावी. भुकेमुळे पेपर लिहिण्यात अडथळे निर्माण होऊ शकतात. हल्क आणि हेल्दी आहार घेऊन पेपरसाठी जावं. याची काळजी पालकांनी आपल्या मुलांबाबत घ्यावी.
या गोष्टी परीक्षा केंद्रात नेण्यास मनाई- खाण्याचा वस्तू, कॉपी, मोबाईल, मेटलचं सामान, रायटिंग पॅड, चेन इत्यादी गोष्टी परीक्षा हॉलमध्ये घेऊन जाण्यास मनाई आहे. या वस्तू आढळल्यास जप्त केल्या जाणार असल्याची पूर्वसूचना विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे.
नियमांचं पालन करणं बंधनकारक- परीक्षागृहातील नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे. नियमबाह्य वर्तन करणाऱ्या विद्यार्थ्यावर कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी भरारी पथकाची नेमणूकही करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांवर भरारी पथकाची नजर असणार आहे.
हेही वाचा-Board Exam : परीक्षेचं टेन्शन दूर करायचं असेल तर एकदा हे VIDEO पाहाच