मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

12 वी पास तरुणाची कमाल, भाजीपाला विकून झाला करोडपती, दिवसाला विकतो 90 हजारांचा माल

12 वी पास तरुणाची कमाल, भाजीपाला विकून झाला करोडपती, दिवसाला विकतो 90 हजारांचा माल

शुभम बिलथरे

शुभम बिलथरे

2013 ते 2020 पर्यंत त्याने 10 ते 12 खासगी नोकऱ्या केल्या. मात्र, दरमहा अशाप्रकारे 10-12 हजार रुपयांची नोकरी किती दिवस करायची, असा विचार त्याने केला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Sagar, India
  • Published by:  Khushalkant Dusane

नवी दिल्ली, 8 डिसेंबर : कमी शिक्षण घेऊनही जिद्द असेल तर मेहनतीने व्यक्ती चांगले उत्पन्न कमावू शकतो आणि करोडपती बनू शकतो, हे एका तरुणाने सिद्ध करुन दाखवले आहे. एका तरुणाने भाजीपाल्याचा व्यवसाय करुन ही मोठी झेप घेतली आहे. शुभम बिलथरे असे या तरुणाचे नाव आहे.

दीड कोटींचा नफा - 

शुभम बिलथरे हा मध्यप्रदेशातील सागर येथील आहे. तो शुभम भिंडी बाजार नावाने स्टार्टअप चालवतो. त्याचे वय 30 वर्ष आहे. तसेच फक्त बारावी पास आहे. त्याला कॉलेजची फी न भरल्यामुळे त्याला बी.टेकचे शिक्षण सोडावे लागले होते. मात्र, यानंतरही त्याने न हारता, न डगमगता ऑनलाईन भाजी विक्रीचा व्यवसाय सुरु केला. आज तो वर्षाला 4 कोटींची उलाढाल करतो. तसेच त्यातील सुमारे 1.5 कोटींचा नफा कमावतो आहे.

2013 ते 2020 पर्यंत त्याने 10 ते 12 खासगी नोकऱ्या केल्या. मात्र, दरमहा अशाप्रकारे 10-12 हजार रुपयांची नोकरी किती दिवस करायची, असा विचार त्याने केला. लॉकडाऊनच्या काळात मुंबईत अडकलेला असताना त्याने छोटीशी नोकरीसोबतच वेब डिझायनिंगचे प्रशिक्षण घेतले. दरम्यान, कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले आणि या कालावधीत लोक घरातच अडकल्याने मोठ्या शहरांमध्ये ऑनलाइन होम डिलिव्हरीची मागणी वाढली. लोक ऑनलाईन भाजीपालाही मागवू लागले.

त्यातच दुसऱ्या लॉकडाऊननंतर शुभम मुंबईहून सागरला परतला. त्यानंतर त्याने भाजीपाला व्यवसाय सुरू करायचे ठरवले. आज या तरुणाचे 4 स्टोअर आहेत. त्यापैकी एक सिधगाव येथे आहे तर उर्वरित 3 दुकाने मक्रोनिया परिसरात आहेत. तो थेट बाजारातून भाजीपाला खरेदी करत असल्याने बाजारापेक्षा 5% कमी दरात लोकांपर्यंत ऑनलाईन डिलिव्हरी करतो.

ग्राहकही खूश -

त्याने 'भिंडी बाजार' नावाचे अॅप आणि वेबसाइट तयार केली. यानंतर घरोघरी जाऊन लोकांना या व्यवसायाबद्दल सांगायला सुरुवात केली. सुरुवातीला लोकांना विश्वास बसत नव्हता. मात्र, नंतर एक-दोन दिवसांत 10 ग्राहक झाले. रोज पहाटे 3-4 वाजता बाजारात जाणे हा त्याच्या आणि त्याच्या टीमचा दिनचर्येचा भाग झाला. नंतर शुभम जास्तीत जास्त ग्राहकांपर्यत पोहोचू लागला. सर्व भाज्या घरपोच आणि बाजारभावात मिळाल्यावर ग्राहकदेखील खूश होते.

हेही वाचा - MPSC Exam : कोल्हापुरातल्या हमालाच्या पोरीने करून दाखवलं.... राज्यात आली पहिली!

भिंडी बाजारच्या अॅपद्वारे, कोणताही ग्राहक त्यांच्या स्थानानुसार वेबसाइट किंवा अॅपला भेट देऊन फळे आणि भाज्यांची ऑर्डर बुक करू शकतो. यासोबतच शहरात आधीच सुरू असलेली मोठी दुकाने, जिथे ग्राहकांची मोठी गर्दी जमते, त्याठिकाणी त्यांना त्याने काही टक्के कमिशन दिले आणि भाजीचे स्टॉल लावायला सुरुवात केली. त्याच्या या युक्तीमुळे त्या दुकानांमध्ये येणारे ग्राहक शुभमशी जोडले जाऊ लागले.

शुभमचा व्यवसाय आता चांगला वाढला आहे. त्याचा भाऊसुद्धा आता त्याच्यासोबत या व्यवसायात आहे. त्यांची एकूण 15 जणांची टीम काम करत आहे. ते डिलिव्हरीसाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करत आहेत. त्याला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. दररोज याठिकाणी ते 90 हजारांचा भाजीपाला विकतात. तसेच ग्राहकांच्या प्रंचड प्रतिसादामुळे दोन तीन दिवस आधीच बुकींग करावी लागते.

First published:

Tags: Business News, Madhya pradesh, Startup, Startup Success Story