हेमंत देसाई
सायको, थर्टी नाइन स्टेप्स, रिअर विंडो, यासारख्या अजरामर चित्रपटांचा दिग्दर्शक आल्फ्रेड हिचकॉक हा मास्टर ऑफ सस्पेन्स, किंवा रहस्यसम्राट म्हणून जगप्रसिद्ध होता. हिचकॉकियन चित्रपटांतील शॉट्सचे फ्रेमिंग आणि कॅमेऱ्याची हालचाल अशी असे की, त्यातून अस्वस्थता, कुतूहल आणि गूढता निर्माण होत असे. जाणते-अजाणतेपणी ज्यांना ‘जाणता राजा’ असे संबोधण्यात येते, त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकारणाचे वर्णन करताना, त्यांना ‘राजकारणातील हिचकॉक’ असे संबोधावेसे वाटते. यापुढे मी कधीही लोकसभेची वा विधानसभेची निवडणूक लढवणार नाही, असे पवार यांनी जाहीर केले होते.
तेव्हा ते राज्यसभेवर निवडून गेले होते. यावेळी मात्र ‘पक्षाच्या आग्रहामुळे’ मी लोकसभा निवडणूक लढवणार आहे, असे पवार यांनी जाहीर केले. त्यानंतर अचानकपणे त्यांनी मी माढ्यातून निवडणूक लढवणार नाही आणि मावळमधून नातू पार्थ पवार यास रिंगणात उतरवणार आहे. बारामतीतून कन्या सुप्रिया सुळे लोकसभा लढवेलच. त्यामुळे एका कुटुंबातील तीनतीन जणांनी निवडणूक लढवू नये, अशा विचारातून हा निर्णय आपण घेतल्याचे सांगितले. वास्तविक आजही अजितदादा पवार, सुप्रियाताई आणि शरद पवार हे आमदार-खासदार आहेतच. तेव्हा अशी भावना असती, तर त्यांनी राज्यसभेवर जाणेच टाळले असते. त्यात आता पार्थही निवडणूक लढवणार असल्यामुळे, एका कुटुंबातील चारजण विधानसभा वा लोकसभेत पक्षाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
चाणाक्ष पवार
माढ्यातून पवार यांनी माघार घेताच, हा युतीसाठी मोठा विजय आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्रक्षी देवेंद्र फडणवीस यांनी दिली. बदललेल्या हवेचा अंदाज पवारांना लवकर येतो, असे पंतप्रधान मोदीही पूर्वी म्हणाले होतेच. पवारांनी अचानकपणे निर्णय बदलल्यानंतर, विरोधक त्यांच्यावर वार करणारच. मी आतापर्यंत चौदा वेळा निवडणूक जिंकली असून, कधीही अपयश पहिलेले नाही, असे पवारांनी म्हटले असले, तरी पंधराव्यांदा काहीही होऊ शकते... कारण राजकारण हा शेवटी शक्यतांचा खेळ असतो आणि तेथे कोणतीही गोष्ट कायम स्वरूपात नसते.
सन 1995 मध्ये पवारांना राज्याच्या सत्तेतून दूर व्हावे लागले, त्यामागे गोपीनाथ मुंडे यांच्या राज्यव्यापी संघर्षयात्रेचा वाटा उल्लेखनीय होता.
पवारांना थेट भिडण्याचे राजकीय धाडस त्यांनी दाखवले. अर्थात मुंड्यांनी पवारांवर केलेल्या बेछूट आरोपांना कोणताही आधार नव्हता. मुंडेंच्या या प्रयत्नांमुळेच महाराष्ट्रात युतीचे सरकार पहिल्या प्रथम आले. त्याच मुंड्यांचा पुतण्या धनंजय याला पवारांनी आपल्या पक्षात खेचले. मुंडेंच्या कन्या पंकजाताई मुंडे व पवार हे एका व्यासपीठावर आले, तेव्हा पंकजाताईंनी ‘राजकारणातले दिलीपकुमार’, असा पवारांचा उल्लेख केला. पवार ऐन तारुण्यात तालुक्याच्या आठवडी बाजारात भाजीपाला विकायला जायचे, तर दिलीपकुमारच्या वडिलांचा फळव्यवसाय होता आणि त्यानेही स्वतः फळविक्री केली आहे.
राजकारणातले दिलीपकुमार
अभिनयात जे दिलीपकुमारचे स्थान आहे, ते महाराष्ट्राच्या राजकारणात पवार यांचे आहे, असे पंकजाताईंना म्हणायेच होते. मात्र दिलीपकुमार हा ‘ट्रॅजेडी किंग’ म्हणून प्रसिद्ध होता आणि पवार यांच्या राजकारणाची शोकांतिका झाली आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे... ज्या बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तुटून पडत असतात, त्यांनाच डॉक्टरेटने गौरवण्यासाठी कोण गेले होते, हेही लोकांना ठाऊक आहे.
यावेळी देशात विरोधी पक्षांना एकत्र आणण्यात पवार यांनी आघाडी घेतली. त्याबद्दल ते कौतुकासच पात्र आहेत. परंतु त्याचवेळी नगर जिल्ह्यातील विखे पाटील कुटुंबाशी असलेले वैर विसरून मतभेद सांधण्यात पवारांना यश मिळालेले नाही. ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू, अरविंद केजरीवाल, राहुल गांधी यांना एकत्र आणून चर्चेला बसवण्यात यश मिळवणाऱ्या पवारांना, नगरमधील तिढा मिटवण्यात अडचण कोणती होती? याचा फायदा भाजप उठवणार, हे माहीत असूनही पवारांनी त्याबाबत उदार भूमिका घेतली नाही, हे दुर्दैवी आहे.
1999 साली पवारांनी विदेशी मूळ असल्याच्या प्रश्नावरून काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी संघर्ष केला. तेव्हा सोनियांना पक्षाध्यक्ष बनून काही महिनेच झाले होते. त्यावेळी पवार काँग्रेसचे लोकसभेतील नेते होते. काँग्रेसला नव्या नेतृत्वाची गरज आहे. पक्षाला पुन्हा वळणावर आणण्यासाठी जनतेचे समर्थन असलेल्या नेत्याची आवश्यकता आहे, असे ते खासगीत पत्रकारांना सांगत होते. प्रत्यक्षात पक्षातील सर्व बडे नेते सोनियांच्या समवेतच राहिले. तेव्हा, मी सोनियाजींच्या अध्यक्ष होण्याच्या विरोधात नाही, तर पंतप्रधानपदाच्या दावेदार म्हणून त्यांना पुढे करण्याच्या विरोधात आहे, असा खुलासा पवार यांनी केला. बोलायचे एक आणि करायचे दुसरेच. आपल्याच विधानातून अनेक अर्थ ध्वनित करायचे आणि नंतर खुलासे करत बसायचे, हीच पवारनीती आहे.
जोड तोडीचं राजकारण
1990 साली काँग्रेसने पंतप्रधान म्हणून चंद्रशेखर यांना बाहेरून समर्थन दिले तसेच 1999 मध्ये जेव्हा अटलबिहारी वाजपेयी सरकार पडले, तेव्हा भाजपने आपल्याला बाहेरून पाठिंबा द्यावा, असा प्रयत्न पवार यांनी केल्याचे सांगण्यात येते. 1991 साली राजीव गांधी यांची हत्या झाल्यानंतर, शरद पवार पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरले होते. तेव्हा, नंतर राष्ट्रकुल घोटाळाफेम झालेले सुरेश कलमाडी हे त्यांचे उजवे हात होते.
मात्र तेव्हा पी. व्ही. नरसिंह राव यांनीच बाजी जिंकली आणि देशात उदारीकरणाचा अध्याय सुरू करण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी त्यांनी बजावली. 1999 साली पवार काँग्रेसमधून बाहेर पडले. कदाचित पक्षातच राहिले असते, आणि त्यांनी सोनियाजींचा व पक्षाचा विश्वास संपादन केला असता, तर 2004 मध्ये तेच पंतप्रधान झाले असते. 1992-93 मध्ये देशाचे संरक्षणमंत्री असताना, हे पद सोडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ते परतले. ही चूक त्यांनी केली नसती, तर त्यांना संरक्षणमंत्री म्हणून छाप उठवण्याची अधिक संधी मिळाली असती.
2014 साली निवडणुका होण्यापूर्वीच, उद्या काँग्रेसप्रणीत आघाडीचे सरकार आल्यास मी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील सरकारामध्ये काम करणार नाही, असे पवारांनी स्पष्ट केले. त्यानंतर दोन वर्षांतच त्यांना राहुलमधील गुणांचा साक्षात्कार होऊ लागला... 2014 मध्ये मोदी पंतप्रधान होऊ शकणार नाहीत, अशी भविष्यवाणी त्यांनी वर्तवली होती. त्यांचा अंदाज पूर्णतः खोटा ठरला. तेव्हा भाजपला 200 पेक्षा कमी जागा मिळाल्या असत्या, आणि निवडणुकीपूर्वीच्या कोणत्याही आघाडीला सरकार बनवणे जमले नसते, तर बिगरकाँग्रेसी पक्षांची मोट बांधण्याबाबत पवार व नितीन गडकरी यांचे बोलणेही झाले होते, असे सांगितले जाते.
यावेळीही भाजप हा सर्वात मोठा पक्ष असेल, पण मोदी पंतप्रधान बनतील असे वाटत नाही, हे भाकित करतानाच, आपण ज्योतिषी नसल्याचे उद्गारही त्यांनी काढले. आपण ज्योतिषी नाही, असे म्हणायचे आणि पुन्हा भविष्यात खोटी ठरणारी भविष्ये सांगायची, हे पवार केव्हा थांबवणार, ते कळायला मार्ग नाही. ज्या पक्षाचे लोकसभेत केवळ चार खासदार आहेत, आणि देशात महागंठबंधनच्या नेत्रदीपक कामगिरीची कुठलीही फारशी चिन्हे अद्याप दिसलेली नाहीत, अशावेळी भाजपचे काय होणार, यापेक्षा स्वपक्षाची चिंता पवारांनी केलेली बरी.
विश्वासाचं काय?
शरद पवार यांच्यावर विश्वास नसल्यामुळे, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी गेल्यावर्षी संविधान रॅलीत सामील होण्याचे टाळले होते. आणि आजही ते काँग्रस-राष्ट्रवादीच्या आघाडीत सामील झालेले नाहीत. 1988 साली पवार महाराष्ट्राचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले, तेव्हा मुंबई महापालिकेच्या 285 भूखंडांच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण गाजले. जनता दलाच्या नेत्या मृणाल गोरे आणि शिवसेनेचे तेव्हाचे आमदार छगन भुजबळ यांनी पवारांवर भूखंडाचे श्रीखंड खाल्ल्याचा आरोप केला होता. तेव्हा त्याबद्दल जाहीर स्पष्टीकरण देण्याऐवजी, पवारांनी मृणालताईंचा उल्लेख ‘पुतनामावशी’ असा केला आणि नंतर त्याबद्दल दिलगिरीही व्यक्त केली.
1978 साली पवारांनी बंड करून राज्याचे मुख्यमंत्रीपद हासिल केले आणि स्वतःची ‘एस काँग्रेस’ उभी केली. राज्यात ठिकठिकाणी काँग्रेसला पर्यायी असे नेतृत्व उभे केले आणि तेव्हा पवारांनी उघड उघड मराठा समाजप्रधान राजकारण सुरू केले होते. मात्र 1980 व 85च्या निवडणुकीत त्यांना सत्ता मिळाली नाही. तेव्हा 1986 साली त्यांचे बंड शांत झाले आणि ते पुन्हा एकदा राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसमध्ये सामील झाले. पवारांनी आयुष्यात फक्त सहा वर्षे खऱ्या अर्थाने बंडखोरी केली. त्यानंतर पुन्हा एकदा ते काँग्रेसबाहेर पडले व त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली, तरी सत्तेच्या आधारेच त्यांचे राजकारण सुरू राहिले. एस काँग्रेसमधून पवार जेव्हा काँग्रेसमध्ये परतले, तेव्हा त्यांनी आपल्या अनुयायांना पोरके केले. सेनियांविरुद्ध बंड करून पुन्हा त्यांच्याशीच आघाडी करणे, फडणवीस सरकारविरोधी अविश्वास ठरावाच्या वेळी सरकारच्या बाजूने उभे राहणे, राज ठाकरे यांना लवकर उठून कामाला लागण्याचा सल्ला देऊन, एकदम त्यांचेच कौतुक सुरू करणे अशी अनेक हिचकॉकियन धक्कातंत्रे पवारांनी करून दाखवली आहेत. मात्र हिचकॉकच्या चित्रपटांमुळे दोन तास माणूस खुर्चीला खिळून राहतो आणि त्याचे मस्त मनोरंजन होते.
पवारांमध्ये बहुश्रुतता, ज्ञान, उत्साह, कष्ट घेण्याची वृत्ती असे अनेक गुण आहेत. परंतु राजकारणात सामान्य जनतेचे प्रेम संपादन करावे लागते. एक विशिष्ट दिशा आणि सातत्य असण्याची आवश्यकता असते. केवळ, बघा मी कसा प्रतिस्पर्ध्याचा गेम केला, त्याला गुगली कशी टाकली, यॉर्कर कसा टाकला, असे म्हणून लोकांना बुचकळ्यात टाकण्याचा आनंद घेत राहायचे, हे खूप झाले. यातून काहीच साध्य होत नाही. धड सरकार येत नाही, विरोधी पक्ष म्हणून समर्थपणे कामही केले जात नाही आणि फक्त अनुयायी व लोकांना गोंधळात टाकण्याचे काम केले जाते. तरीही शरद पवार हे उद्या देशाचे पंतप्रधान होतील, असे स्वप्न बघून, आणि पवारांचा जयजयकार करून, ज्यांना आनंद घ्यायचा आहे, त्यांनी तो खुशाल घ्यावा.
((लेखक राजकीय विश्लेषक असून ब्लॉगमध्ये त्यांनी व्यक्त केलेली मतं त्यांची वैयक्तिक आहेत. त्याचा News18 शी संबंध असेलच असे नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.