मुंबई, 24 डिसेंबर : भारतीय वाहन बाजारात सध्या इलेक्ट्रिक कारची चलती आहे. इलेक्ट्रिक कार्सच्या सेगमेंटमध्ये सध्या टाटा मोटर्स कंपनीचा दबदबा आहे. आता ही कंपनी येणाऱ्या नवीन वर्षात आणखी एक नवीन इलेक्ट्रिक कार लाँच करण्याच्या तयारीत आहे. ही लाँच करण्यात येणारी कार देशातली सर्वांत स्वस्त इलेक्ट्रिक कार असू शकते, असा अंदाज लावला जातोय. ‘टीव्ही 9 हिंदी’ने याबाबतचं वृत्त दिलंय.
टाटा मोटर्स ही भारतातली सर्वांत जास्त इलेक्ट्रिक कार्सची विक्री करणारी कंपनी आहे. कंपनीने इलेक्ट्रिक वाहन सेगमेंटमध्ये ‘नेक्सॉन ईव्ही’द्वारे सुरुवात केली होती. यानंतर ‘टिगोर ईव्ही’ आणि ‘टियागो ईव्ही’ ही मॉडेल्सही लाँच केली. आता येत्या नवीन वर्षात कंपनी ‘टाटा पंच ईव्ही’ लाँच करण्याच्या तयारीत आहे. रिपोर्ट्सनुसार, ही कार देशातली सर्वांत स्वस्त इलेक्ट्रिक एसयूव्ही असू शकते. नवीन इलेक्ट्रिक कारची विक्री 2023मध्ये सुरू केली जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : महिंद्रा लाँच करणार परवडणारी थार; जाणून घ्या किती असेल किंमत
टाटा मोटर्सने आतापर्यंत विविध इलेक्ट्रिक कार मॉडेल्स लाँच केली आहेत. या यादीत आता ‘टाटा पंच’चं नावही आलं आहे. या गाडीच्या डिझाइनबद्दल बोलायचं झाल्यास, आगामी ‘टाटा पंच ईव्ही’चा लूक हा सध्याच्या ‘टाटा पंच पेट्रोल’ मॉडेलसारखा असू शकतो. तसंच या गाडीच्या इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये काही बदलदेखील केले जाऊ शकतात.
सर्वांत स्वस्त ईव्ही कार?
टाटाच्या आगामी इलेक्ट्रिक कारची संभाव्य एक्स-शोरूम किंमत 10 लाख रुपयांपासून सुरू होऊ शकते. लाँच झाल्यानंतर ही कार भारतातली सर्वांत स्वस्त इलेक्ट्रिक एसयूव्ही बनेल. ‘टाटा पंच ईव्ही’ भारतीय बाजारपेठेतल्या कोणत्याही कारशी थेट स्पर्धा करणार नाही; पण ही नवीन इलेक्ट्रिक कार काही प्रमाणात ‘नेक्सॉन ईव्ही’ आणि महिंद्रा एक्सयूव्ही 400 (Mahindra XUV400) ईव्ही या गाड्यांशी स्पर्धा करू शकते.
हेही वाचा : फक्त Nexonच नाही, Tataच्या ‘या’ Electric Carसाठी ग्राहकांच्या रांगा, पाहा किंमत अन् फिचर्स
एका चार्जिंगमध्ये 300 किलोमीटर धावेल
‘टाटा पंच ईव्ही’ ही कंपनीची पहिली इलेक्ट्रिक कार असेल, जी अल्फा प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. रिपोर्ट्सनुसार, आगामी इलेक्ट्रिक कारमध्ये 25 kWh क्षमतेच्या बॅटरी पॅकचा वापर केला जाऊ शकतो. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही कार 250 ते 300 किलोमीटर अंतर धावेल. याशिवाय, नवीन इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये जलद चार्जिंग क्षमतादेखील उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. तसंच टाटा पंचच्या आगामी इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये टाटा पंचच्या पेट्रोल व्हर्जनपेक्षा अधिक फीचर्स असू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Car, Electric vehicles, Tata group