नवी दिल्ली, 4 डिसेंबर : सध्या देशात इंधनाच्या किमती आकाशाला जाऊन भिडल्या आहेत. पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-diesel) वाढत्या किमतींचा ताण जनतेच्या खिशावर पडत आहे. त्यामुळे पर्यायी इंधनाच्या आणि इलेक्ट्रिक गाड्या वापण्याची गरज निर्माण झाली आहे. देशातली सर्वांत मोठी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया इलेक्ट्रिक कार (Electric car) खरेदीसाठी साह्य करण्याचा विचार करत आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) इलेक्ट्रिक कारसाठी स्वस्त आणि सुलभ कर्ज योजना सुरू केली आहे. 'ग्रीन कार लोन' (Green Car Loan) असं या योजनेचं नाव आहे. या योजनेंतर्गत पेट्रोलियम इंधनाच्या कारसाठी दिल्या जाणाऱ्या कर्जापेक्षा कमी व्याजदरात कर्ज दिलं जाईल, असा दावा बँकेनं केला आहे.
या कर्ज योजनेत बँक कुठल्याही प्रकारचा फाइल चार्ज घेणार नाही. त्यामुळे झिरो प्रोसेसिंग शुल्कासह (Zero processing) हे ग्रीन कार लोन उपलब्ध होणार आहे. 31 जानेवारी 2022 पर्यंत झिरो प्रोसेसिंग शुल्काची सवलत सुरू राहणार आहे. इलेक्ट्रिक कार किंवा बाइक खरेदीसाठी घेतल्या जाणाऱ्या कर्जावरचा व्याजदर इतर कर्जांच्या तुलनेत 0.20 टक्के कमी आहे. ग्रीन कार लोन 3 ते 8 वर्षांच्या कालावधीसाठी दिलं जात आहे. या ऑफरअंतर्गत कार किंवा बाइकच्या ऑन-रोड किमतीच्या 90 टक्के रक्कमेचं कर्ज घेता येतं.
वाचा : ना पेट्रोल, ना डिझेल, ना CNG; नेमकी कशी चालते नितीन गडकरींची ही खास कार
इलेक्ट्रिक वाहनं होतील स्वस्त
इलेक्ट्रिक वाहनं सर्वसामान्य जनतेच्या आवाक्यात आणण्यासाठी सरकार या वाहनांच्या किमती कमी करण्याची योजना तयार करत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी याबाबत घोषणाही केली आहे. त्यामुळे येत्या काळात इलेक्ट्रिक वाहन उद्योगाला चालना देण्यासोबतच वाहनांच्या विक्रीलाही गती मिळणार आहे.
इलेक्ट्रिक वाहनाची किंमत पेट्रोल व्हॅरिएंटच्या बरोबरीची असेल. इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग सुविधांचा विस्तार करण्यासाठी सरकार काम करत आहे. 2023पर्यंत इलेक्ट्रिक वाहन व्यवसायात क्रांती घडवून आणण्यासाठी काम केलं जात आहे. इलेक्ट्रिक वाहनांसाठी देशातल्या प्रमुख महामार्गांवर 600 हून अधिक ठिकाणी चार्जिंग पॉइंट्स (Charging points) उभारले जाणार आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अलीकडेच एका कार्यक्रमात दिली होती.
वाचा : आता WhatsApp वर बुक करता येणार Uber, पाहा काय आहे प्रोसेस
इलेक्ट्रिक वाहनांसाठी येणारा खर्च पेट्रोल आणि डिझेल वाहनांच्या खर्चापेक्षा लक्षणीयरीत्या कमी असेल. काही इलेक्ट्रिक वाहनं फक्त 1 रुपया प्रति किलोमीटर दरानं प्रवास करू शकतील. अवघ्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या वाहनांप्रमाणे इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये असतील, असंही गडकरी म्हणाले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Car, Electric vehicles, SBI