स्टॉकहोम, 18 ऑक्टोबर: आजपर्यंत तुम्ही माणसांसाठी उभारलेल्या सेल्फी बूथबद्दल ऐकलं असेल. कधीतरी तुम्ही स्वत: सेल्फी बूथवर जाऊन सेल्फी काढले असतील. पण स्वीडनमध्ये चक्क पाळीव कुत्र्यासाठी सेल्फी बूथ उभारण्यात आलं आहे. स्वीडिश टीव्ही होस्ट, युट्यूबर आणि रोबोटिक्सची अभ्यासक सिमोन गिर्ट्झ यांनी आपल्या पाळीव कुत्रीसाठी चक्क एक सेल्फी बूथ उभारलं आहे. कुत्रा हा फक्त पाळीव प्राणी राहिलेला नाही फक्त राखणदार किंवा सोबतीही नाही. पाळीव कुत्र्याचं आणि त्याच्या मालकांचं नातं काही वेगळंच असतं. पाळीव कुत्रा त्याच्या मालकाच्या कुटुंबाचा अविभाज्य घटक झालेला असतो. सध्या कुत्रांमध्येही निरनिराळ्या कला जागृत होताना दिसत आहेत. कधी एखादा कुत्रा गाण्यावर डोलताना आपल्याला बघायला मिळतो. तर कधी काही व्हिडिओमध्ये लहान मुलांसोबत दिलखुलास खेळतानाही दिसतो. या सर्व कलांमध्ये आता एक नवी कला जोडली जाणार आहे ती म्हणजे कुत्र्यांनी स्वतः सेल्फी घेण्याची. सिमोन गिर्ट्झ यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या ट्विटर अकाऊंटवर 3 फोटो पोस्ट केले ज्यामध्ये त्यांची पाळीव कुत्री एका छोट्या खोक्यात उभी आहे आणि तिचा पाय एका पेडलवर आहे. या फोटोला तिने असं कॅप्शन दिलं होतं, “मी माझ्या पाळीव कुत्रीसाठी हे सेल्फी बूथ बनवलं आहे ज्यात ती स्वतःचे छान सेल्फी काढू शकते. तेही फक्त एका पेडलवर पंजा ठेवून.”
या फोटोंसोबत लगोलग तिने आपल्या अकाउंटवर 2 विडिओदेखील पोस्ट केले. त्यातील एकात तिची 3 पाय असणारी कुत्री अगदी मजेत तिच्या सेल्फी बूथमध्ये जाऊन बसताना दिसते. तसंच दुसऱ्या व्हिडिओमध्ये गिर्ट्झ आपल्या या संकल्पनेबद्दल बोलताना म्हणते की तिला कुत्र्यांच्या फोटोंची आवड आहे, तिने खूप छान कुत्र्यांचे फोटो पाहिले पण कधी कुत्र्यांचा छान सेल्फी पहिला नव्हता. म्हणूनच तिने हा विचार केला की ती स्वतःच आपल्या पाळीव कुत्रीसाठी एक सेल्फी बूथ उभारेल. या व्हिडीओ मध्ये तिने सेल्फी बूथ कसं उभारलं याची पूर्ण माहिती दिली आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओंना तुफान प्रतिसाद दिला असून, सिमोनच्या ट्विटला 180 K व्ह्यूज मिळाले असून ते 22,००० वेळा रिट्विट झालं आहे. युट्युब व्हिडीओलाही 2 लाख लाइक्स मिळाले आहेत. ‘OMG! हे बेस्ट आहे. आपल्या शक्ती चांगल्या गोष्टींसाठी कशा वापराव्या याचं हे उत्तम उदाहरण आहे.’ अशी एक प्रतिक्रिया ट्विटमध्ये आली आहे तर दुसऱ्या व्यक्तीने सिमोनला नोबेल का दिला जाऊ नये अशी विचारणा ट्विटमधून केली आहे. एखादी व्यक्ती आपल्या पाळीव प्राण्यावर किती प्रेम करू शकते याचं हे जिवंत उदाहरण आहे.