110 वर्षांच्या आजी
मुंबई, 09 फेब्रुवारी : साधारण वयाची सत्तरी गाठली की केस गळतात आणि दातही पडतात. आजकाल तर कमी वयामध्येच अनेकांना ही समस्या जाणवते. मात्र, पश्चिम बंगालमधील एका 110 वर्षांच्या आजींना आता नवीन केस आणि दात आले आहेत. हे पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. यानिमित्त या आजींचा वाढदिवसही साजरा करण्यात आला. बजबज नगरपालिका हद्दीतील रामचंद्रपुरात या आजी राहतात. या आजींचं नाव सखीबाला मोंडल आहे. या आजींच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये ‘दीदीर दूत’ (मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचे दूत) देखील सहभागी झाले होते. याशिवाय, बज बज क्रमांक 2 ब्लॉकचे उपाध्यक्ष बुकन बॅनर्जी हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. नवीन केस आणि दात मिळाल्यामुळे सखीबाला मंडल यांना नवं जीवन मिळाल्यासारखंच वाटतंय. त्यामुळे सखीबाला आजी वयाच्या 110 व्या वर्षी वाढदिवस साजरा करताना फार आनंदी होत्या. या कार्यक्रमाला त्यांची 80 वर्षांची मुलगी, नातू, नात आणि त्यांची मुलं-मुली आणि कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते. हे ही पाहा : हे ही पाहा : तरुण तरुणीकडून कुत्र्याच्या पिल्लाच्या जीवाशी खेळ, Video पाहून येईल चीड वाढदिवस साजरा करण्यासाठी केक कापला गेला आणि त्यानंतर आजींना शाकाहारी जेवण देण्यात आलं. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात सखीबाला आजींना आणखी काही दिवस जगण्याची इच्छा आहे. दंत चिकित्सक श्यामल सेन यांच्या म्हणण्यानुसार, “हा प्रकार अत्यंत दुर्मिळ आहे पण, अशक्य नाही. कारण, एक वर्षापूर्वी घाटल येथे अशीच घटना घडली होती. तिथे 100 वर्षांच्या वृद्ध महिलेला नवीन दात आले होते.” ते पुढे म्हणाले की, सस्तन प्राण्यांमध्ये कधीही नवीन केस आणि दात वाढू शकतात.
सामान्यतः वृद्ध व्यक्तींचं वय झाल्यामुळे त्यांच्या शरीरातील कॅल्शियम आणि इतर खनिजं कमी झालेली असतात. दातांच्या आणि केसांच्या वाढीसाठी आवश्यक घटक शरीरात नसल्यामुळे अशा घटना मोठ्या प्रमाणात आढळत नाहीत. परिणामी वृद्धापकाळात दात आणि केस येण्याची घटना दुर्मिळ मानली जाते.
या कार्यक्रमात ‘दीदीर दूत’ (मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचे दूत) आणि बजबज क्रमांक 2 ब्लॉकचे उपाध्यक्ष बुकन बॅनर्जी हे उपस्थित होते. बजबज क्रमांक 2 ब्लॉकचे उपाध्यक्ष बुकन बॅनर्जी म्हणाले की, आजींच्या आशीर्वादामुळेच या भागात मुख्यमंत्री ममतादीदींना काम करण्याची संधी मिळाली. वाढदिवसाच्या पार्टीला उपस्थित राहून खूप आनंद झाला आहे. त्यांच्या पुढाकारानं परिसरात मिठाईचं वाटपही करण्यात आलं.