जॉर्जिया 15 मार्च : सध्या अमेरिकेत (USA) एका नव्याच प्रकारच्या चोरांनी उच्छाद मांडला आहे. हे आहेत फ्रंट पोर्च चोर (Front Porch Theives). ऑनलाईन ऑर्डर केलेल्या वस्तू अनेकदा ज्यांनी ऑर्डर केली आहे त्यांच्या घराच्या दारात ठेवल्या जातात. वस्तू घेणारे लोक आपल्या सोयीनं ती वस्तू घरात घेऊन जाता. मात्र, सध्या अशा दारात ठेवलेल्या वस्तू चोरण्याचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. या चोरांना फ्रंट पोर्च चोर म्हटलं जातं. नुकतीच जॉर्जिया स्टेटमध्ये (Georgia State) अशीच एक घटना घडली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यामध्ये एक महिला एका घराच्या दारात ठेवलेली वस्तू घेऊन पळून जाताना दिसते. वस्तू उचलायला येत असताना तिचा टॉप निघालेला आहे, तरीही ती अजिबात न थांबता कपडे सावरत पुढं येऊन वस्तू उचलून क्षणार्धात वाऱ्याच्या वेगानं पळून जाताना दिसत आहे. या घराच्या दारात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV) ही सगळी घटना कैद झाली. त्या महिलेचा चेहराही अगदी स्पष्ट दिसून आला. सीसीटीव्हीशी जोडलेली बेल वाजल्यानं या घराच्या मालकिणीला गडबड झाल्याचा संदेश मिळाला. तिनं सीसीटीव्हीत पाहिलं असतात कपडे निघाले असूनही चोरी करणं न थांबवणारी ही महिला तिला स्पष्ट दिसली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून अर्ध नग्न होऊनही चोरी करणं न थांबावणाऱ्या महिलेबाबत तिनं आश्चर्य व्यक्त केलं आहे.
दरम्यान, या चोरीची तक्रार हॅरीस कौंटी पोलिसांकडं नोंदवण्यात आली आहे. याबाबत आम्ही या चोरीचा तपास करत असून, लवकरच या महिलेला अटक करू असा विश्वास पोलीस अधिकारी अॅलन रोसेन यांनी फॉक्स न्यूजशी बोलताना व्यक्त केला. अमेरिकेतील अनेक राज्यांमध्ये अशा चोरी होणाऱ्या वस्तूंसाठी एक किमान किंमत मर्यादा ठरविण्यात आली असून, त्यापेक्षा अधिक किमतीची वस्तू असल्यास अशी चोरी हा किरकोळ गुन्हा न मानता गंभीर गुन्हा म्हणून नोंदवण्यात येत आहे. दरम्यान, या कपडे निघूनही हातातली वस्तू न सोडणाऱ्या महिलेनं कपडयांच्या पार्सलचीच चोरी केल्याचं निष्पन्न झालं आहे. ‘खावो 11’ वृत्तपत्रानं ही माहिती दिली आहे. फॉक्स न्यूजच्या वृत्तानुसार, अलीकडच्या काही वर्षांमध्ये ऑनलाईन शॉपिंग (Online Shopping) वाढल्यापासून अशा फ्रंट पोर्च चोरांचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. विशेषतः सुट्ट्यांच्या काळात (Holidays) याचे प्रमाण अधिक असतं, कारण सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात लोक खरेदी (Shopping) करतात. त्यामुळं डोअरबेल कॅमेऱ्यांची (Doorbell Camera) मागणी वाढत आहे. दरम्यान, अशा चोऱ्यांच्या वाढत्या प्रमाणामुळं जॉर्जियाचे गव्हर्नर ग्रेग अबोट यांनी दोन वर्षांपूर्वीच एक नवीन कायदा आणून अशा चोरीच्या गुन्ह्यासाठी दंडाची रक्कम वाढवली आहे. मात्र अशा चोरीमुळे मालकाचं किती नुकसान होतं याची कल्पनाही चोरांना नसते, त्यामुळं अशा गुन्ह्यांसाठी केवळ दंड न करता, ते गंभीर गुन्हे मानून कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी वाढत आहे.