'मी मरियम खान या नावाने माझा आयडी बनवला होता. कारण इथे सोशल मीडियावर मुलींचं खरं नाव लिहिणं योग्य मानलं जात नाही.'
नवी दिल्ली, 27 जुलै : पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरबाबत दररोज नवे खुलासे होत आहेत. चार मुलांची आई असताना तिने पबजी खेळता खेळता एका वेगळ्याच देशातल्या तरुणाच्या प्रेमात पडणं, प्रेमापोटी अवैधरीत्या भारत गाठणं, या सगळ्यावरून तपास यंत्रणांना या प्रकरणात काहीतरी काळंबेरं असण्याची शक्यता वाटत आहे. हा भारताविरोधात रचलेला मोठा कट असू शकतो, अशी भीतीही अनेकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे तपास यंत्रणांकडून सातत्याने या प्रेम प्रकरणामागचं खरं सत्य जाणून घेण्याची धडपड सुरू आहे. सीमा तिच्या वक्तव्यांवर ठाम आहे, म्हणूनच ही उत्तरं ती तोंडपाठ तर करून आली नाहीये ना, अशी शंका उपस्थित होतेय. याचबाबत तपासासाठी तिची वारंवार चौकशी करण्यात येतेय. दरम्यान, आम्ही पबजीच्या माध्यमातून अचानक एकमेकांच्या संपर्कात आलो आणि त्यातूनच आमचं बोलणं वाढलं, आम्ही प्रेमात पडलो, असं सचिन-सीमाने पोलिसांसमोर अनेकदा सांगितलं आहे. मात्र काही दिवसांपूर्वी या प्रकरणातून आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली, ज्यामुळे तपास यंत्रणांचा सीमावरील संशय आणखी बळावला.
मिळालेल्या माहितीनुसार, पबजी खेळात सीमाचं स्वतःच्या नावावे आयडी नव्हतं. ती ‘मरियम खान’ या नावाने पबजी खेळायची. याच व्यक्तीशी बोलता बोलता सचिनची ओळख वाढली आणि मग त्याला या नावामागे सीमा असल्याचं कळलं. सीमाने स्वतःच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत याबाबत खुलासा केला. सचिन फक्त एक मोहरा? सीमाचा उद्देश वेगळाच? वाचा महत्त्वाची अपडेट सीमाने सांगितलं की, ‘मी मरियम खान या नावाने माझा आयडी बनवला होता. कारण इथे सोशल मीडियावर मुलींचं खरं नाव लिहिणं योग्य मानलं जात नाही.’ सीमा रात्री हा खेळ खेळायची आणि हळूहळू तिला यामध्ये मजा येऊ लागली. 2020 मध्ये पबजी खेळताना सचिनशी ओळख झाली. तिचं नाव मरियम खान नसून सीमा हैदर असल्याचं तिने सचिनला नंतर सांगितलं. दरम्यान, या सगळ्यावरून मरियम खान नावामागे नक्की सीमाच होती की, तिचा वापर करून सचिनला हनीट्रॅपमध्ये व्यवस्थित अडकवण्यात आलं आणि मग भारतात धाडण्यासाठी तिला समोर आणलं, अशी शक्यता उपस्थित होत आहे. शिवाय सीमाने तिच्यावर संशय येऊ नये म्हणून स्वतःच वृत्तवाहिन्यांसमोर खेळातल्या खोट्या नावाबद्दल उघड केलं का? असा संशयही निर्माण झाला आहे.