पाकिस्तानातून अवैध मार्गाने भारतात येणं एवढं सोपं आहे का? उर्दू प्रदेशात राहणाऱ्या सीमाला एवढं अस्खलित हिंदी आणि इंग्रजीचं ज्ञान कसं? 4 मुलांची आई पबजीसारखा हिंसक खेळ खेळायची? 4 मुलांच्या आईला पबजीवरून प्रेमात पडायला वेळ कसा मिळायचा? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे भारतीय नागरिकत्त्व मिळवण्यासाठी सचिनला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पाकिस्तानातून अलगद भारतात येणारी सीमा दहशतवादी तर नाही ना? असे प्रश्न सोशल मीडियावरून सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.
नेपाळच्या पशुपतीनाथ मंदिरात हिंदू पद्धतीने लग्न केल्याचा दावा करून पाकिस्तानातून अवैधरीत्या भारतात आलेली सीमा नोएडात सचिनसोबत राहू लागली तेव्हाच भारतीय तपास यंत्रणांना तिच्यावर संशय आला. उत्तर प्रदेश एटीएसने सीमा हैदर, तिचा नवरा सचिन मीणा आणि सासरा नेत्रपाल यांना ताब्यात घेतलं. त्यांची कसून चौकशी करण्यात आली.
एटीएस अधिकाऱ्यांनी सीमाला अनेक प्रश्न विचारले. पासपोर्ट, पैसे, दहशतवादी संघटनांशी संबंध, पाकिस्तानातील कुटुंब, कुटुंबाचा इतिहास, अशा सर्व बाजूंनी एटीएस अधिकाऱ्यांनी तिची चौकशी केली. सीमाने सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. मात्र यातील अनेक उत्तरं समाधानकारक नव्हती. अशातच आता सीमाच्या प्रेमावरच प्रश्न उपस्थित झाले आहेत.
'भारतात सहज प्रवेश मिळावा यासाठी सीमाने सौंदर्याच्या जोरावर सचिन मीणा या सर्वसामान्य तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. पुढे काही त्रास होऊ नये यासाठी आताच भारतीय नागरिकत्त्व मिळवण्यासाठी धडपड केली. आता कोणालाही संशय येणार नाही, अशापद्धतीने ती शांतपणे सगळी माहिती गोळा करून पाकिस्तानला पुरवणार आणि मग भारताविरोधात मोठा कट रचला जाणार', अशा विविध चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलं असून या संशयामुळेच तिला भारतातून हकलवून लावा, अशी मागणी अनेकांनी केली आहे.
दरम्यान, सीमाबरोबर आलेली 4 मुलं तिचीच आहेत की, तिच्या कटाचा भाग आहेत, याबाबतही सोशल मीडियावर शंका उपस्थित केली जात आहे. मात्र तपास यंत्रणांचं सीमावर बारीक लक्ष आहे. त्यामुळे काय खरं आणि काय खोटं, यावरून लवकरच पडदा बाजूला होईल.