लाहौर 14 मार्च : लोक अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं आपलं प्रेम व्यक्त करत असतात किंवा समोरच्याला प्रपोज करत असतात. मात्र, याचीच किंमत आता एका विद्यार्थ्याला आणि विद्यार्थीनीला चुकवावी लागली आहे. ही घटना आहे. पाकिस्तानच्या लाहौर विद्यापिठातील (Lahore University). या विद्यापिठानं विद्यार्थीनी आणि या विद्यार्थ्याची थेट हकालपट्टी केली आहे. यामागं कारण आहे, एक प्रपोज. झालं असं, की विद्यार्थीनीनं सर्वांसमोर गुडघ्यावर बसून विद्यार्थ्याला फूल दिलं आणि मिठी मारली. कॅम्पसमधील या प्रेमाच्या प्रस्तावाचा व्हिडीओ (Love Proposal Video) सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. यानंतर विद्यापिठानं कारवाई करत या दोघांचीही हकालपट्टी केली. लाहोर विद्यापिठाच्या विशेष शिस्त समितीनं शुक्रवारी बैठकीनंतर दोन्ही विद्यार्थ्यांना समन्स बजावलं होतं, परंतु फोन करूनही दोघेही याठिकाणी पोहोचले नाहीत. तेव्हा समितीनं आपला निर्णय जाहीर केला. विद्यापीठाच्या अधिकृत निवेदनात समितीनं विद्यार्थीनी आणि विद्यार्थ्याला विद्यापीठातून काढून टाकण्याच्या आणि कॅम्पसमधील दोघांच्या प्रवेशावर बंदी घालण्याच्या निर्णयाचाही उल्लेख केला आहे. विद्यापीठ प्रशासनाच्यावतीनं सांगण्यात आलं की, ‘दोन्ही विद्यार्थ्यांनी गैरवर्तन केलं असून विद्यापीठाच्या नियमांचं उल्लंघन केलं आहे.’ प्रेमाच्या प्रस्तावाचा हा ट्वीटरवर चांगलाच व्हायरल झाला. इतकंच नाही तर गुरुवारी हा व्हिडीओ सोशल मीडियावर टॉप सर्चमध्येही होता. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक मुलगी गुडघ्यावर बसून आणि हातामध्ये गुलाबाची फुलं घेऊन मुलासमोर आपलं प्रेम व्यक्त करताना दिसत आहे. यानंतर हा मुलगा ती फुलं घेतो आणि मुलीला मिठी मारतो. आसपास उपस्थित विद्यार्थी या दोघांचा व्हिडीओ काढताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंत विद्यापिठानं हा निर्णय घेतला आहे.
या दोघांना विद्यापिठातून काढून टाकल्यानंतर अनेकांना मोहब्बतें सिनेमाची आठवण झाली. काहींनी सोशल मीडियावर अमिताभ बच्चन यांचा फोटो पोस्ट करत त्याला लाहौर महाविद्यालयाचे मुख्याध्यापक म्हटलं आहे. मोहब्बते सिनेमामध्ये अमिताभ बच्चन गुरुकूलचे प्राचार्य आहे, जे प्रेमाच्या विरोधात असतात. तर, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान दिवंगत बेनजीर भुट्टो यांची मुलगी बख्तावर भुट्टो जरदारीनं विद्यापिठाच्या या निर्णयाला बकवास म्हटलं आहे.