चुकीच्या तारखेमुळे अमनला आता नववीत प्रवेश मिळणं अवघड झालं आहे.
गुलशन कश्यप, प्रतिनिधी जमुई, 21 जुलै : फेब्रुवारी महिन्यात कधी 28 दिवस असतात आणि कधी 29 दिवस असतात याबाबत सर्वांचा गोंधळ होतो. मात्र फेब्रुवारीत इतर महिन्यांसारखे 30 किंवा 31 दिवस नसतात, हे लहान मुलं सोडल्यास साधारण सर्वांना माहित असतं. मात्र अशातच बिहारच्या एका शाळेने एका विद्यार्थ्याची जन्मतारीख चक्क 30 फेब्रुवारी अशी लिहिली आहे. त्यामुळे आता बिहारच्या शिक्षण क्षेत्रात पुन्हा एकदा गोंधळ उडाला आहे. बिहारच्या जमुई जिल्ह्यात असलेल्या वाजपेईडीह शाळेतील हा प्रकार आहे. राजेश यादव यांचा मुलगा अमन कुमार हा या शाळेचा विद्यार्थी असून इयत्ता आठवी उत्तीर्ण झाल्यानंतर त्याला मुख्याध्यापकांकडून मिळालेल्या ट्रान्सफर सर्टिफिकेटमध्ये त्याची जन्मतारीख 30 फेब्रुवारी 2009 अशी लिहिलीये. ही तारीख सध्या मोठा चर्चेचा विषय ठरली आहे. परंतु चुकीच्या तारखेमुळे अमनला आता नववीत प्रवेश मिळणं अवघड झालं आहे.
अमनचे वडील राजेश यादव यांनी सांगितलं की, ‘आम्ही अनेकदा मुख्यध्यापकांना माझ्या मुलाच्या जन्मतारखेतील चूक सुधारण्याची विनंती केली. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं. कधी आज शिक्काच विसरलो, कधी आज शाळेतच येणार नाही, अशी वेगवेगळी कारणं ते द्यायचे. त्यांच्या या चुकीची शिक्षा आता माझ्या मुलाला भोगावी लागतेय’, असा आरोप त्यांनी केला. ‘माझ्या मुलाला नववीत प्रवेश मिळत नाहीये’, असं ते म्हणाले. ‘या’ गावकऱ्यांना चक्क मोबाईल टॉवर नकोय! पाहा काय आहे कारण? याप्रकरणी जिल्हा शिक्षणाधिकारी कपिलदेव तिवारी यांना विचारलं असता त्यांनी सदर शाळेच्या मुख्यध्यापकांकडून याबाबत स्पष्टीकरण मागितलं असल्याचं सांगितलं. हे स्पष्टीकरण मिळताच पुढील कारवाई करण्यात येईल, असं ते म्हणाले. त्याचबरोबर, ‘अशी चूक कोणी जाणूनबुजून करत नाही. अजाणतेपणाने अशी चूक होऊ शकते. मात्र या प्रकरणात वारंवार विनंती करूनही मुख्यध्यापकांनी वेळेत लक्ष घातलं नाही, याचा अर्थ ते या पदासाठी लायक नाहीत. त्यामुळे याबाबत नियुक्ती समितीलाही पत्र पाठवलं जाईल आणि ते मुख्यध्यापकांच्या पदाबाबत निर्णय घेतील’, असंही जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितलं.