भारत वि. झिम्बाब्वे
हरारे, 18 ऑगस्ट: भारत आणि झिम्बाब्वे संघात तीन सामन्यांच्या वन डे मालिकेतील पहिला सामना सध्या हरारेत सुरु आहे. या सामन्यात झिम्बाब्वेनं भारतीय संघासमोर विजयासाठी 190 धावांचं आव्हान ठेवलं आहे. दीपक चहर, अक्षर पटेल आणि प्रसिद्ध कृष्णाच्या भेदक आक्रमणासमोर झिम्बाब्वेचा डाव 40.3 षटकात 189 धावात आटोपला. सामन्याआधी भारतीय कर्णधार लोकेश राहुलनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं. कर्णधाराचा हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. सहा महिन्यानंतर पुनरागमन करणारा वेगवान गोलंदाज दीपक चहरनं सातव्याच षटकात भारताला पहिलं यश मिळवून दिलं. त्यानंतर ठराविक अंतरानं झिम्बाब्वेचे फलंदाज बाद होत गेले. चहरनं 27 धावात 3 विकेट्स आपल्या नावावर करत वन डेत जोरदार कमबॅक केलं. चहरपाठोपाठ अक्षर पटेलनंही आपल्या फिरकीच्या जोरावर यजमान संघाच्या फलंदाजांना नाचवलं. त्यानं सेट झालेल्या रेगिस चकाबावाची विकेट काढून मोठा अडसर दूर केला. चकाबावानं सर्वाधिक 35 धावांचं योगदान दिलं. अक्षर पटेलनं 7.3 षटकात 2 षटकं निर्धाव टाकताना अवघ्या 24 धावात 3 विकेट्स घेतल्या. चहर आणि पटेलला युवा गोलंदाज प्रसिद्ध कृष्णानंही सुरेख साथ दिली. कृष्णानंही 50 धावात 3 फलंदाजांना माघारी धाडलं. तर मोहम्मद सिराजनं एक विकेट घेतली. हेही वाचा - Virat Kohli: विराट कोहलीसाठी आजचा दिवस का आहे खास? पाहा कोहलीची ‘विराट’ कारकीर्द इवान्स-एनगारावान झुंजवलं दरम्यान झिम्बाब्वेची एकवेळ 8 बाद 110 अशी अवस्था झाली होती. पण त्यानंतर ब्रॅड इवान्स आणि एनगरावानं नवव्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी साकारली. त्यामुळे झिम्बाब्वेला 189 धावांचा टप्पा गाठता आला. इवान्सनं ना. 33 धावांचं योगदान दिलं. तर एनगरावानं 34 धावा केल्या. झिम्बाब्वेकडून वन डेत 9व्या विकेटसाठी केलेली ही सर्वोच्च भागीदारी ठरली. प्रसिद्ध कृष्णानं एनगारावाची विकेट काढत ही जोडी फोडली.