युवराज सिंग
मुंबई, 23 नोव्हेंबर: युवराज सिंग हे नाव भारतीय क्रिकेटला नवं नाही. क्रिकेटविश्वात सिक्सर किंग अशी ओळख असलेल्या युवीनं तीन वर्षांपूर्वी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. पण आजही युवीची क्रेझ भारतात कायम आहे. मात्र सध्या युवराज सिंगचं नाव एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलंय. युवीचा गोव्यातल्या मोरजीममध्ये एक आलिशान बंगला आहे. याच बंगल्यावरुन आता युवीवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. गोव्याच्या पर्यटन विभागाकडून तशी नोटीसही युवीला पाठवण्यात आली आहे. काय आहे नेमकं प्रकरण? युवराज सिंगनं आपल्या याच आलिशान व्हिलामध्ये पर्यटकांना राहण्यासाठी आमंत्रित केलं होतं. पण यासंदर्भात त्यानं आपल्या मालमत्तेची कोणत्याही प्रकारची नोंदणी केलेली नव्हती. त्यामुळे टूरिस्ट ट्रेड अॅक्टनुसार राज्याच्या पर्यटन विभागाकडून युवराजला नोटीस पाठवण्यात आली आहे. या नोटीसमध्ये कोणत्याही परवानगीशिवाय युवराजच्या व्हिलामध्ये पर्यटकांना आमंत्रित केलं जात असल्याचं म्हटलं आहे. त्यानुसार 8 डिसेंबरआधी पर्यटन उपनिदेशकांच्या कार्यालयात युवराजला प्रत्यक्ष हजर राहण्याचे किंवा 1 लाख रुपये दंड स्वरुपात भरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हेही वाचा - Team India: भर मैदानात टीम इंडियाच्या खेळाडूंनी उमरान मलिकला का मारलं? Video Viral गोवा सरकारचं अभियान राज्यातली नोंदणीकृत नसलेली अशी अनेक हॉटेल्स आणि व्हिला गोवा सरकारच्या सध्या रडारवर आहेत. याच शोधमोहिमेत युवराज सिंगच्या ‘कासा सिंग’ या व्हिलावरही राज्य सरकारचं लक्ष गेलं. अवैधरित्या भाड्यानं देण्यात येणाऱ्या अशा 400 मालमत्तांना आतापर्यंत नोटीस देण्यात आल्याची माहिती आहे. गोव्यात मालमत्ता भाड्यानं देताना त्याची नोंदणी सरकारकडे करणं बंधनकारक आहे. त्यासाठी ठराविक रक्कम आकारुन नोंदणी करता येते. पण अवैधरित्या वापर करणाऱ्यास एक लाखापर्यंत दंडाची तरतूद आहे.
कसं आहे युवीचं ‘कासा सिंग?’ उत्तर गोव्यातल्या मोरजीममध्ये युवीचं हे ‘कासा सिंग’ व्हिला आहे. चापोरा नदीकिनारी असलेल्या या आलिशान व्हिलामध्ये राहण्यासाठी युवराजनं महिनाभरापूर्वी पर्यटकांना आमंत्रित केलं होतं. या व्हिलामध्ये युवीच्या क्रिकेटिंग करिअरमधील त्यानं वापरलेल्या काही गोष्टीही ठेवण्यात आल्या आहेत.