वर्ल्ड कपसाठी वेस्ट इंडिज संघ जाहीर
मुंबई, 15 सप्टेंबर**:** टी20 वर्ल्ड कपसाठी आज वेस्ट इंडिजनं 15 सदस्यीय संघाची घोषणा केली. निकोलस पूरनच्या नेतृत्वाखालील दोन वेळा टी20 वर्ल्ड कप जिंकाणारा वेस्ट इंडिजचा संघ ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी विश्वचषक मोहिमेत सामील होणार आहे. पण ही संघनिवड करताना वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डानं काही धक्कादायक निर्णय घेतले आहेत. वर्ल्ड कपसाठीच्या या संघात आयपीएलसह जगातल्या टी20 लीग गाजवणाऱ्या दोन खेळाडूंना स्थान देण्यात आलेलं नाही. त्यामुळे क्रिकेट वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. रसेल-सुनील नारायण ‘आऊट’ वेस्ट इंडिजचा आक्रमक फलंदाज म्हणून आंद्रे रसेलची अख्ख्या जगात ख्याती आहे. वेस्ट इंडिजकडून खेळतानाच रसेलनं कॅरेबियन प्रिमियर लीग, आयपीएल, बिग बॅश, दक्षिण आफ्रिकेतील टी20 लीग, इंग्लंडमधील हंड्रेड लीग अशा स्पर्धांमध्येही वेगवेगळ्या संघांचं प्रतिनिधित्व केलं आहे. टी20च्या मैदानात जगातल्या सर्वात धोकादायक फलंदाजांमध्ये रसेलचं नाव घेतलं जातं. पण वेस्ट इंडिजच्या वर्ल्ड कप संघातून मात्र रसेलला विंडीज क्रिकेट बोर्डानं वगळलं आहे. रसेलसोबतच वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डानं 34 वर्षांचा ऑफ ब्रेक बॉलर सुनील नारायणलाही बाहेरचा रस्ता दाखवला आहे. टी20 क्रिकेटमध्ये रसेल आणि सुनील नारायण या दोघांकडेही मोठा अनुभव गाठीशी आहे. पण वेस्ट इंडिजच्या संघासाठी त्यांचं योगदान फार कमी आहे. रसेलनं गेल्या टी20 वर्ल्ड कपनंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. तर सुनील नारायण वेस्ट इंडिज संघात खेळून जवळपास तीन वर्ष उलटली आहेत. त्यामुळे वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड आणि निवड समिती नेमका हाच मुद्दा घेऊन पुढे गेली असल्याचं मुख्य निवडकर्ते डेस्मंड हेन्स यांनी म्हटलं आहे. पूरनकडे नेतृत्व**,** लेविसचं कमबॅक गेल्या वर्षी कायरन पोलार्डच्या नेतृत्वात वेस्ट इंडिजनं आपला संघ वर्ल्ड कपच्या मैदानात उतरवला होता. पोलार्डसह ख्रिस गेल, ड्वेन ब्रॅव्हो, रसेल असे दिग्गज या संघात होते. पण वर्षभरात ब्रॅव्हो-पोलार्डनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. गेलसाठीही तो वर्ल्ड कप अखेरचा ठरला. त्यामुळे आता निकोलस पूरनच्या नेतृत्वात एक नवा संघ वेस्ट इंडिजनं वर्ल्ड कपसाठी मैदानात उतरवला आहे. त्यात बरेच महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेला सलामीवीर एविन लुईसला संघात स्थान देण्यात आलं आहे.
वर्ल्ड कपसाठीचा वेस्ट इंडिज संघ निकोलस पूरन (कर्णधार), रोमन पॉवेल, यानिक कॅरीआ, जॉन्सन चार्ल्स, शेल्डन कॉटरेल, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, अकील हुसेन, अल्झारी जोसेफ, ब्रेंडन किंग, एविन लुईस, काईल मायर्स, ओबेद मॅकॉय, रायमन रेफर, ओडियन स्मिथ