मुंबई, 20 जानेवारी : आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताची मान उंचावणाऱ्या आणि पदकांची कमाई करणाऱ्या कुस्तीपटूंनी सध्या भारतीय कुस्ती महासंघा विरोधात आंदोलनाची तलवार उगारली आहे. बुधवार 18 जानेवारी पासून दिल्ली येथील जंतरमंतरवर भारताचे ऑलिम्पिक पदक विजेते कुस्तीपटू आंदोलनासाठी बसले असून त्यांनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. आज ह्या आंदोलनाचा तिसरा दिवस असून या आंदोलनाची दखल आता भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्ष पी.टी. उषा यांनी देखील घेतली आहे. तसेच या आंदोलनाला राजकारणाचा रंग लागू नये म्हणून भारतीय बॉक्सर आणि काँग्रेस पार्टीचा सदस्य असलेला विजेंद्र सिंह याला आंदोलकांनी मंचावरून खाली उतरवले. हे ही वाचा : RCB संघाच्या ट्विटर अकाऊंटवर हॅकर्सचा कब्जा भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर कुस्तीपटूंनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने तर बृजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण करण्याचा देखील आरोप केला आहे. विनेशने याबाबतचा पुरावा आपल्याकडे असल्याचा दावा देखील केला आहे. यासह बृजभूषण हे पैलवानांचे मानसिक छळ करीत असल्याचा आरोप करून त्यांना अध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी कुस्तीपटूंनी केली आहे. भारताची धावपटू आणि ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्ष असलेल्या पी टी उषा यांनी पैलवानांच्या आंदोलनाची दखल घेतली आहे. हे ही वाचा : IND VS NZ : भारतीय क्रिकेट टीमच्या ड्रेसिंग रूममध्ये काय चालतं? बघा हा व्हिडिओ पी टी उषा यांनी ट्विट करत लिहिले की, “मी सदस्यांसोबत कुस्तीपटूंच्या सध्याच्या विषयावर चर्चा करत आहे आणि आम्हा सर्वांसाठी खेळाडूंचे कल्याण आयओएची सर्वोच्च प्राथमिकता आहे. आम्ही खेळाडूंना विनंती करतो की त्यांनी पुढे यावे आणि त्यांच्या समस्या आमच्याकडे मांडाव्यात. कुस्तीपटूंना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही याबाबत संपूर्ण चौकशीची करू” असे त्यांनी सांगितले. तसेच भविष्यात उद्भवणाऱ्या अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी आणि जलद कारवाईसाठी एक विशेष समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याचे देखील पी टी उषा यांनी स्पष्ट केले.
शुक्रवारी सकाळी भारताचा दिग्गज बॉक्सर विजेंद्र सिंह हा देखील कुस्तीपटूंच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी जंतरमंतरवर पोहोचला. परंतु विजेंद्र हा काँग्रेस पार्टीचा सदस्य असल्याने कुस्तीपटूंच्या आंदोलनाला राजकीय रंग लागू नये म्हणून त्याला मुख्य आंदोलन व्यासपीठावरून खाली उतरण्यास सांगण्यात आले. त्यांनतर विजेंद्र सिंह हा इतर आंदोलक कुस्तीपटूंसह मैदानावर बसला होता. जो पर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोवर हे आंदोलन सुरूच राहणार असे कुस्तीपटूंनी सांगितले आहे. तसेच आंदोलन सुरु असे पर्यंत कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कुस्तीपटू सहभागी होणार नाहीत असे आंदोलकांनी सरकारला ठणकावून सांगितले आहे. त्यामुळे कुस्तीपटूंच्या या मागण्या पूर्ण होतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.