टेबल टेनिसपटू शरथ कमाल
मुंबई, 14 नोव्हेंबर: भारतीय क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार म्हणजे मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार. आज 2022 सालच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यात गेली दोन दशकं टेबल टेनिसमध्ये भारताचं नाव जगाच्या नकाशावर झळकवणाऱ्या एका दिग्गजाला खेल रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या खेळाडूचं नाव आहे अचंता शरथ कमल. शरथ कमाल आज 40 वर्षांचा आहे. पण तीन महिन्यांपूर्वी झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत याच शरथ कमलनं भारताला तब्बल तीन सुवर्णपदकं जिंकून दिली होती. त्याच्या आजवरच्या कामगिरीचा सन्मान करताना भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयानं मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कारासाठी त्याच्या नावाची घोषणा केली आहे. शरथ कमलची कारकीर्द टेबल टेनिसमध्ये शरथ कमल हे नाव आदरानं घेतलं जातं. वयाच्या चाळीसाव्या वर्षी शरथच्या खेळातील चपळता वाखाणण्याजोगी आहे. त्यामुळे अनेक युवा खेळाडूंसाठी शरथ कमल प्रेरणास्थान बनला आहे. तामिळनाडूच्या चेन्नईमधील कमलनं वयाच्या चौथ्या वर्षीपासूनच टेबल टेनिसची रॅकेट हातात घेतली. या खेळाचा वारसा त्याला घरातूनच मिळाला होता. कारण शरथ कमलचे वडील आणि काका राज्य स्तरावर टेबल टेनिस खेळले होते. पण कमलनं त्यांच्याही बरंच पुढे जात मोठी मजल मारली.
राष्ट्रकुल स्पर्धेत मोठं यश शरथ कमलला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतला सर्वात यशस्वी खेळाडू मानलं जातं. आपल्या 16 वर्षांत्या कारकीर्दीत त्यानं भारतासाठी राष्ट्रकुलमध्ये 13 पदकं जिंकली आहेत. सर्वाधिक राष्ट्रकुल पदकविजेत्या भारतीय खेळाडूंमध्ये शरथ तिसऱ्या क्रमांकावर आहे. शरथच्या आधी पहिला क्रमांक लागतो तो नेमबाज जसपाल राणाचा. राणानं राष्ट्रकुल स्पर्धेत 9 सुवर्णपदकांसह तब्बल 15 पदकं पटकावली आहेत. तर समशेरच्या नावावर 7 सुवर्णपदकांसह 14 पदकं आहेत. राष्ट्रकुलसह एशियाड आणि एशियन चॅम्पियनशीपमध्येही पदकांची कमाई केली आहे.
राष्ट्रीय चॅम्पियन शरथ कमलनं आतापर्यंत तब्बल 10 वेळा राष्ट्रीय चॅम्पियन ठरला आहे. अशी कामगिरी करणारा तो भारताचा एकमेव टेबल टेनिसपटू आहे. हेही वाचा - Breaking: शिष्याच्या कामगिरीनं उंचावली गुरुची मान, रोहितच्या प्रशिक्षकांना क्रीडा क्षेत्रातला ‘हा’ मानाचा पुरस्कार ऑलिम्पिकमध्ये मात्र निराशा पण शरथ कमलला ऑलिम्पिक पदकानं मात्र हुलकावणी दिली. त्यानं 2004 च्या सिडनी, 2008 साली बीजिंग, 2016 साली रिओ आणि 2021 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतला होता. पण त्याला पदकाशिवाय परतावं लागलं.
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा दरम्यान आज क्रीडा मंत्रालयान इतर पुरस्कारांचीही घोषणा केली. 25 जणांना अर्जुन पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. त्यात महाराष्ट्राचा धावपटू अविनाश साबळेचा समावेश आहे. तर सात प्रशिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर करण्यात आला असून रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड यांचं नावही या पुरस्काराच्या यादीत आहे.