मेलबर्नमध्ये पावसाचा खेळ
मेलबर्न, 28 ऑक्टोबर: यंदाच्या टी20 वर्ल्ड कप मध्ये सध्या खेळाडूंपेक्षा पावसाचाच खेळ जास्त चालला आहे. आज मेलबर्नमध्ये पुन्हा पावसानं चाहत्यांची निराशा केली. पावसामुळे आज सुपर 12 फेरीतले दोन्ही सामने रद्द करण्याची वेळ आली. भारतीय वेळेनुसार सकाळच्या सत्रात अफगाणिस्तान आणि आयर्लंड संघात सामना होणार होता. पण पावसाच्या सततच्या व्यत्ययामुळे हा सामना रद्द करावा लागला. त्यानंतर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघातल्या सामन्यातही पावसानं वक्रदृष्टी फिरवली. त्यामुळे आजच्या दिवसातले टी20 वर्ल्ड कपचे दोन्ही सामने रद्द करावे लागले आणि चारही संघांना प्रत्येकी 1-1 गुण घेऊन समाधान मानावं लागलं.
‘ग्रुप ऑफ डेथ’मध्ये उलटफेर होणार? इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, श्रीलंका, आयर्लंड, अफगाणिस्तान अशा मातब्बर संघांचा भरणा असलेल्या टी20 वर्ल्ड कपच्या ग्रुप 1ला ग्रुप ऑफ डेथ असं म्हटलं गेलं आहे. या गटातून कोणता संघ सेमी फायनल गाठणार हे अद्याप तरी सांगता येण्यासारखं नाही. कारण पावसामुळे या ग्रुपमधील 4 सामने वाया गेले आहेत. त्यामुळे उर्वरित सामन्यांच्या निकालावरच टॉप 2 मध्ये कोण राहणार हे कळेल.
ग्रुप 1 मध्ये काय आहे स्थिती? ग्रुप 1 मध्ये न्यूझीलंडचा संघ सध्या 3 गुणांसह नंबर एकवर आहे. तर इंग्लंड दुसऱ्या क्रमांकावर आहे.
मेलबर्नमध्ये पावसाचाच खेळ
गेल्या आठवड्यापासून मेलबर्नमध्ये पावसाळी वातावरण पाहायला मिळतंय. सुदैवानं भारत आणि पाकिस्तान संघातला सामना कोणत्याही व्यत्याविना पार पडला. पण त्यानंतर प्रत्येक सामन्यात पावसानं हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. मेलबर्नमध्ये आतापर्यंत झालेले पाचपैकी 3 सामने पावसामुळे रद्द करावे लागले आहेत. तर 6 नोव्हेंबरला भारत आणि झिम्बाब्वे सामना इथेच होणार आहे. याशिवाय टी20 वर्ल्ड कपची फायनलही 13 नोव्हेंबरला मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर होणार आहे.