टीम इंडिया
दुबई, 31 ऑगस्ट: आशिया चषकात पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर भारतीय संघ सज्ज झालाय स्पर्धेतल्या दुसऱ्या सामन्यासाठी. आशिया चषकातल्या ब गटात भारत आणि पाकिस्तानसह पात्रता फेरीतून आलेल्या हाँगकाँगचाही समावेश आहे. याच हाँगकाँगसोबत टीम इंडिया आज साखळी फेरीतला आपला दुसरा सामना खेळणार आहे. भारतीय वेळेनुसार दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजता या सामन्याला सुरुवात होईल. भारताच्या तुलनेत हाँगकाँगचा संघ अगदी नवखा आहे. त्यामुळे हाँगकाँगविरुद्ध टीम इंडिया निर्विवाद वर्चस्व गाजवेल अशी अपेक्षा आहे. रोहित-राहुलला संधी गेल्याच आठवड्यात पार पडलेल्या झिम्बाब्वे दौऱ्यात सहा महिन्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करणारा लोकेश राहुल आणि टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला पुन्हा फॉर्मात येण्यासाठी एक मोठी संधी आहे. पाकिस्तानविरुद्ध या दोघांनाही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्या सामन्यात लोकेश राहुलला पहिल्याच ओव्हरमध्ये शून्यावरच माघारी परतावं लागलं होतं. तर रोहित शर्माही 12 धावा काढून बाद झाला. त्यामुळे हाँगकाँगविरुद्ध दोघांनाही मोठी धावसंख्या उभारण्याची संधी आहे. हाँगकाँग दुसऱ्यांदा स्पर्धेत पात्रता फेरीत यूएई, कुवेत आणि सिंगापूर अशा संघांना मागे टाकून हाँगकाँगनं आशिया चषकात दुसऱ्यांदा आपली पात्रता सिद्ध केली आहे. याआधी 2018 साली हाँगकाँगचा संघ पहिल्यांदा आशिया चषकात खेळला होता. त्यावेळीही भारत, पाकिस्तान आणि हाँगकाँग एकाच गटात होते. पण त्या दोन्ही सामन्यात हाँगकाँगला पराभव स्वीकारावा लागला. यंदाची स्पर्धा टी20 फॉरमॅटमध्ये खेळवली जात आहे. त्यामुळे हाँगकाँग अनपेक्षित कामगिरी करणार का हे पाहावं लागेल.
सामना - आशिया चषक ब गट, भारत वि. हाँगकाँग वेळ – संध्याकाळी, 7.30 वा. ठिकाण – दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम थेट प्रक्षेपण – स्टार स्पोर्टस आणि डिस्ने हॉटस्टार