अॅडलेड, 03 नोव्हेंबर : अॅडलेडच्या मैदानात बांगलादेशचा डकवर्थ लुईस नियमानुसार 5 धावांनी पराभव केला. भारतीय संघाचा यंदाच्या वर्ल्ड कपच्या मैदानातला हा तिसरा विजय ठरला. त्यामुळे संघ पॉईंट टेबलमध्ये 6 पॉईंटसह पहिल्या नंबरवर पोहोचला आहे. बुधवारी झालेल्या भारत विरुद्ध बांगलादेशच्या सामन्यात भारतीय संघासाठी (Team India) एका खेळाडूने मैदानाबाहेरून केलेली मदत सध्या चर्चेचा विषय ठरली. सामना सुरु असताना टीम इंडियाचा साईड आर्म थ्रोवर रघू (Raghu) सीमारेषेवर उभा होता. रघू हा सीमारेषेच्या पलीकडे उभा राहून सतत टीम इंडियातील खेळाडूंचे शुज साफ करून देत होता. रघुने खेळावर आणि आपल्या देशावर असलेल्या निष्ठेपोटी आपल्या ठरलेल्या कामाच्या पुढे जाऊन संघासाठी पडेल ते काम करायला मागेपुढे पाहिले नाही. सामना सुरू असताना ब्रश घेऊन उभा असलेला रघू कॅमेऱ्यात टिपला गेला. तो सीमारेषेवर ब्रश घेऊन काय काम करत होता आणि ते किती महत्त्वाचे होते हे कळाल्यानंतर सोशल मीडियावर रघुचे चांगलेच कौतुक होत आहे. रघू हा भारतीय संघाचा साईड आर्म थ्रो डाऊन स्पेशालिस्ट आहे. नेटमध्ये भारतीय फलंदाज सराव करतात त्यावेळी त्यांना मदत करणे इतकेच रघुचे काम होते. पण, बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात रघूने यापलीकडे जात जे काम केलं, त्यामुळे देशभरातून क्रीडाप्रेमी त्याचे कौतुक करत आहेत. हे वाचा - विराटच्या मेहनतीचं झालं चीज… टीम इंडियाचा हा बॅट्समन पुन्हा फॉर्मात सामन्याच्या दुसऱ्या डावात बांगलादेशची फलंदाजी सुरू असताना 7 षटके झाल्यानंतर पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे काहीवेळ हा सामना थांबवण्यात आला होता. पाऊस थांबल्यानंतर खेळाला पुन्हा सुरुवात झाली. मात्र, पावसामुळे मैदानात थोडा चिखल झाला होता. त्यामुळे चेंडू पकडण्यासाठी धावताना खेळाडू घसरुन पडण्याची शक्यता होती. मैदान ओले झाल्याने खेळाडूंच्या बुटांना माती चिकटत होती. त्यामुळे टीम इंडियाचे खेळाडू घसरुन जखमी होण्याची शक्यता होती. अशावेळी रघू टीम इंडियाच्या मदतीसाठी पुढे आला आणि संघाची कामगिरी चांगली होण्यात त्याने योगदान दिले. हे वाचा - Video : कोहलीनं दाखवलं ‘विराट’ मन, फॉर्मात नसलेल्या खेळाडूला केली मदत पावसानंतर सामना सुरू झाल्यावर रघू सीमारेषेवर जाऊन उभा राहिला. त्याच्या हातामध्ये ब्रश होता. भारतीय संघ क्षेत्ररक्षण करत असताना रघू मैदानाच्या चारी बाजूंना फिरून सीमारेषेवर उभ्या असलेल्या भारतीय खेळाडूंच्या शूजला चिकटलेली माती ब्रशने साफ करून देत होता. जेणेकरून धावताना कोणताही खेळाडू घसरुन पडू नये. हा सामना संपेपर्यंत रघू टीम इंडियासाठी पाण्याची बाटली आणि ब्रश घेऊन सीमारेषेवर उभा होता. त्यामुळे भारतीय संघाच्या विजयाबरोबच सोशल मीडियावर रघूचीही चर्चा होत आहे.