टीम इंडियाचा मालिकाविजय
नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर: नवी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर शिखर धवनच्या टीम इंडियानं पराक्रम गाजवला. दिल्लीतल्या वन डेत टीम इंंडियान दक्षिण आफ्रिकेचा 7 विकेट्सनी धुव्वा उडवला आणि तीन सामन्यांची मालिका 2-1 अशा फरकानं खिशात घातली. महत्वाचं म्हणजे भारतीय संघानं या मालिकेत पहिला सामना गमावूनही मालिकाविजय साकार केला. लखनौची पहिली वन डे भारतानं 9 धावांनी गमावली होती. त्यानंतर रांची वन डेत टीम इंडियानं कमबॅक करताना श्रेयस अय्यर आणि ईशान किशानच्या खेळीनं भारताला 7 विकेट्सनी विजय मिळवून दिला. त्यानंतर आज दिल्ली वन डेतही वर्चस्व गाजवून भारतानं ही मालिकाही आपल्या नावावर केली. दरम्यान तर महत्वाचे खेळाडून टी20 वर्ल्ड कपमुळे संघाबाहेर असताना युवा शिलेदारांना घेऊन धवननं मालिका जिंकण्याचा पराक्रम गाजवला हे विशेष. दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं भारतासमोर अवघं 100 धावांचं आव्हान ठेवलं होतं. सलामीवीर शुभमन गिल (49) आणि फॉर्मात असलेल्या श्रेयस अय्यरच्या (28) खेळीनं भारताला अवघ्या 19.1 ओव्हर्समध्ये सहज विजय मिळवून दिला. पण कमी धावसंख्येच्या या सामन्यात कॅप्टन शिखर धवन (8) आणि ईशान किशन (10) हे मात्र अपयशी ठरले.
दक्षिण आफ्रिकेची दाणादाण त्याआधी टीम इंडियाच्या प्रभावी आक्रमणासमोर पाहुण्या दक्षिण आफ्रिकेची दाणादाण उडाली. मालिकाविजयाच्या निर्धारानं मैदानात उतरलेल्या दोन्ही संघांपैकी टीम इंडियाचं पारडं नवी दिल्लीत भारी ठरलं. धवननं टॉस जिंकून दक्षिण आफ्रिकेला पहिल्यांदा बॅटिंगचं आमंत्रण दिलं. टीम इंडियाच्या बॉलर्सनी ढगाळ वातावरण आणि ओलसर खेळपट्टीचा पुरेपूर फायदा उठवताना आपल्या कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवला. सुरुवातीला मोहम्मद सिराज आणि वॉशिंग्टन सुंदरनं दक्षिण आफ्रिकेची आघाडीची फळी माघारी धाडली. त्यानंतर कुलदीप यादव आणि शाहबाजच्या फिरकीसमोर दक्षिण आफ्रिकेचा डाव पत्त्यांसारखा कोसळला. दक्षिण आफ्रिकेनं अवघ्या 27.1 ओव्हर्स खेळून काढल्या आणि त्यांचा डाव 99 धावात आटोपला. हेही वाचा - BCCI President: पाहा कोण होणार बीसीसीआयचे नवे अध्यक्ष? सौरव गांगुलींनंतर आणखी एक माजी क्रिकेटर अध्यक्षपदी? कुलदीप यादवची जादू वॉशिग्टन सुंदर, सिराज आणि शाहबाजनं दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ तंबूत धाडल्यानंतर कुलदीपनं तळाच्या फलंदाजांना जास्त वेळ खेळपट्टीवर राहू दिलं नाही. त्यानं 4.1 ओव्हरमध्ये एक ओव्हर निर्धाव टाकताना 18 धावात 4 विकेट्स घेतल्या. तर सिराज, शाहबाज आणि वॉशिंग्टन सुंदरनं प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. दक्षिण आफ्रिकेकडून हेनरिच क्लासेननं सर्वाधिक 34 धावा केल्या. त्यापाठोपाठ यानेमन मलान आणि मॅक्रो यान्सन या दोघांनाच दुहेरी धावसंख्या गाठता आली. पण उर्वरित आठ फलंदाच एकेरी धावसंख्येवर माघारी परतले.
टीम इंडियाचा पराक्रम यंदाच्या वर्षात टीम इंडियानं सलग पाच वन डे मालिका जिंकण्याचा पराक्रम गाजवला. फेब्रुवारीपासून भारतीय संघानं वेस्ट इंडिजविरुद्ध दोनदा तर दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि झिम्बाब्वे या संघांविरुद्ध एकदा मालिकाविजय साजरा केला.