मुंबई, 11 ऑक्टोबर: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठीची प्रक्रिया आजपासून सुरु झाली आहे. लवकरच अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव कोषाध्यक्ष आणि संयुक्त सचिव पदासाठी निवडणुका होणार आहेत. 11 आणि 12 ऑक्टोबरला यासाठी अर्ज दाखल केले जाणार असून 13 ऑक्टोबरला अर्जांची छाननी होईल. त्यानंतर 18 ऑक्टोबरला निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याकडे आयसीसीकडून मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे गांगुली आता या पदावर राहणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे या जागेवर आणखी एका माजी खेळाडूची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. तर विद्यमान सचिव जय शाह त्याच पदावर कायम राहण्याची शक्यता आहे. अध्यक्षपदासाठी रॉजर बिन्नी यांचं नाव आघाडीवर बीसीसीआयचे पुढचे अध्यक्ष म्हणून आता रॉजर बिन्नींचं नाव आघाडीवर आहे. 67 वर्षांचे रॉजर बिन्नी हे भारताचे माजी कसोटीवीर असून ते 1983 च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचेही सदस्य आहेत. 18 ऑक्टोबरला होणाऱ्या बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सौरव गांगुली पद सोडणार असल्याची माहिती आहे. त्यानंतर बिन्नी त्यांची जागा घेतील हे जवळपास नक्की आहे. हेही वाचा - MCA Elections : राज्यात विरोधात पण एमसीएमध्ये एकत्र, पवारांच्या पाठिंब्याने शेलार मैदानात!
गुरुवारी झाली होती बैठक मिळालेल्या माहितीनुसार गेल्या गुरुवारी बोर्डाच्या अनेक पदाधिकाऱ्यांची बैठक झाली होती. दिल्लीत झालेल्या बैठकीत बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शाह, उपाध्यक्ष राजीव शुक्ला, माजी अध्यक्ष एन श्रीनिवासन आणि खजिनदार अरुण धुमल यांच्यासह आयपीएल चेअरमन ब्रिजेश पटेलसह अनेक अधिकारी सहभागी झाले होते. आजही बरेच अधिकारी मुंबईतही एका बैठकीसाठी जमले होते. या बैठकीत पदांसदर्भात बोलणी झाल्याचं समजतंय.
Mumbai | BCCI Secretary Jay Shah, and its Vice-President Rajeev Shukla leave for BCCI headquarters to file nominations for posts in the Cricket body. Maharashtra BJP MLA Ashish Shelar also present. pic.twitter.com/CqGPj0B2ta
— ANI (@ANI) October 11, 2022
आशिष शेलार खजिनदारपदी?
आजच्या बैठकीत भाजपचे आशिष शेलार आणि जय शाह एकत्र दिसले. इतकच नाही तर आगामी निवडणुकीत आशिष शेलार यांनी खजिनदारपदासाठी अर्ज केला आहे.
याच महिन्यात संपतोय गांगुलींचा कार्यकाळ
दरम्यान बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली यांचा कार्यकाळ याच महिन्यात संपुष्टात येत आहे. गांगुली आणि जय शाह यांनी 24 ऑक्टोबर 2019 मध्ये आपला पदभार सांभाळला होता. दोघांचा कार्यकाळ याच महिन्यात संपणार आहे. माहितीनुसार गांगुली आणि शाह सुप्रीम कोर्टाच्या मंजुरीनंतर 2025 नंतर त्याच पदावर कायम राहू शकले असते. पण गांगुली या पदावरुन दूर होणार असल्याचं कळतंय.