मुंबई, ७ जानेवारी : भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या टी २० मालिकेतील तिसरा सामना आज पारपडणार आहे. आजचा सामना दोन्ही संघांसाठी निर्णायक ठरणार असून तिसरा सामना जिंकणारा संघ टी २० मालिकेचा विजेता ठरणार आहे. गुजरात राज्यातील राजकोट येथील स्टेडियमवर तिसरा टी २० सामना होणार असून शुक्रवारी भारतीय संघ राजकोट येथे दाखल झाला. यावेळी हॉटेल मध्ये प्रवेश करणाऱ्या भारतीय संघाचे जल्लोषपूर्ण स्वागत करण्यात आले. हे ही वाचा : IND VS SL : तिसऱ्या टी २० सामन्यात कोणाचं पारडं राहणार जड? कधी, कुठे पहाल सामना? राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट संघाच्या क्रिकेट स्टेडियमवर आजचा सामना आयोजित करण्यात आला आहे. गुरुवारी पुण्यात दुसरा टी २० सामना झाल्यानंतर शुक्रवारी दुपारी भारतीय संघ राजकोट मधील आरक्षित हॉटेलवर दाखल झाला. यावेळी तेथील आयोजकांनी त्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. गुजरात येथील गरबा नृत्य आणि विविध वाद्यांच्या ठेक्यावर उत्साहपूर्ण वातावरणात भारतीय संघाचे स्वागत झाले. याचा व्हिडीओ बीसीसीआयने आपल्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट केला आहे.
भारत विरुद्ध श्रीलंका टी २० मालिका ३ जानेवारी पासून सुरु झाली. मुंबईत झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने २ धावांनी श्रीलंकेवर विजय मिळवला. तर पुण्यात एमसीए क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या टी २० सामन्यात श्रीलंकेने भारतावर १६ धावांनी विजय मिळवला. आजचा तिसरा सामना जिंकणं दोन्ही संघांसाठी महत्वाचा ठरणार आहे.