लखनौत दक्षिण आफ्रिकेची बाजी
लखनौ, 6 ऑक्टोबर: लखनौतल्या पहिल्या वन डेत शिखर धवनच्या टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेकडून अवघ्या 9 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. गब्बरचे शेर मालिकेतल्या पहिल्याच लढतीत ढेर झाले. पण संजू सॅमसन हा एक शेर मात्र शेवटपर्यंत लढला. पावसामुळे 40-40 ओव्हरच्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं टीम इंडियासमोर 250 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण त्याचा पाठलाग करताना भारतीय संघ 240 धावाच करु शकला. संजू सॅमसन आणि श्रेयस अय्यरनं झुंजार खेळी करुन भारताला विजयाकडे नेण्याचा प्रयत्न केला पण त्यांचे प्रयत्न 9 धावांनी अपुरे पडले. श्रेयस-सॅमसनची झुंजार खेळी भारताचे चार आघाडीचे फलंदाज माघारी परतल्यानंतर श्रेयस अय्यर आणि संजू सॅमसननं भारताचा डाव सावरला. श्रेयसनं वन डे क्रिकेटमध्ये आपला फॉर्म कायम राखताना आणखी एक अर्धशतकी खेळी केली. त्यानं 37 बॉलमध्ये 50 धावा केल्या. श्रेयस आणि सॅमसन जोडीनं पाचव्या विकेटसाठी 67 धावांची भर घातली. श्रेयस बाद झाल्यानंतर संजू सॅमसननं मात्र शार्दूल ठाकूरच्या साथीनं भारताला विजयाच्या अगदी जवळ नेलं. या जोडीनंही सहाव्या विकेटसाठी तब्बल 93 धावा जोडल्या. त्यात शार्दूलचा वाटा होता 33 धावांचा. त्यानंतर मात्र दक्षिण आफ्रिकन बॉलर्सनं वर्चस्व गाजवलं. आणि भारताला विजयापासून दूर ठेवण्यात यश मिळवलं. संजू सॅमसननं अखेरपर्यंत झुंज देताना नाबाद 86 धावांची खेळी केली.
अखेरच्या ओव्हरचा थरार शेवटच्या ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी भारताला 30 धावा हव्या होत्या. पहिल्याच बॉलमध्ये वाईड टाकून शम्सीनं हे समीकरण 6 बॉल 29 असं केलं. पहिल्या बॉलवर संजू सॅमसननं लाँग ऑनवरुन सिक्सर ठोकला. दुसऱ्या बॉलवर स्क्वेअर लेगला आणि तिसऱ्या बॉलवर स्ट्रेट हिट खेळून त्यानं 2 फोर वसूल केले. त्यामुळे 3 बॉल 15 अशी स्थिती बनली. त्यावेळी सॅमसन भारताला जिंकून देणार असं सर्वांनाच वाटलं. पण अखेरच्या 3 बॉलवर केवळ 5 धावा निघाल्या आणि भारतानं हा सामना 9 धावांनी गमावला. दक्षिण आफ्रिकेकडून एनगिडीनं तीन आणि रबाडानं दोन विकेट घेतल्या. तर पार्नेल, केशव महाराज आणि शम्सीला प्रत्येकी एक विकेट मिळाली. शम्सी सगळ्यात महागडा गोलंदाज ठरला. त्यानं 8 ओव्हर्समध्ये तब्बल 89 रन्स दिले.
हेही वाचा - Womens Asia Cup: शुक्रवारी भारत-पाक महामुकाबला… पण त्याआधीच पाकिस्तानची झाली अशी हालत, Video दक्षिण आफ्रिकेचा धावांचा डोंगर त्याआधी डेव्हिड मिलर आणि एनरिच क्लासेनच्या दमदार भागीदारीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेनं 40 ओव्हरमध्ये 4 बाद 249 धावांचा डोंगर उभा केला. एडन मारक्रम (0), कॅप्टन टेंबा बवुमा (8), यानेमन मलान (22) हे तीन दक्षिण आफ्रिकन बॅट्समन सुरुवातीला फारसा प्रभाव टाकू शकले नाहीत. पण क्विंटन डी कॉकनं टी20तला आपला फॉर्म वन डेतही कायम ठेवताना 48 धावांची खेळी केली. डी कॉक आऊट झाला तेव्हा दक्षिण आफ्रिकेची स्थिती 4 बाद 110 अशी होती. पण त्यानंतर मिलर आणि क्लासेननं डावाची सूत्र आपल्या हाती घेत 139 धावांची अभेद्य भागीदारी साकारली. मिलरनं 63 बॉल्समध्ये नाबाद 75 तर क्लासेननं 65 बॉल्समध्ये नाबाद 75 धावांचं योगदान दिलं.
भारताकडून शार्दूलनं दोन तर कुलदीप आणि रवी बिश्नोईनं प्रत्येकी एक विकेट घेतली. या सामन्यात खराब फिल्डिंगचा फटका भारतीय संघाला बसला. शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, सिराज आणि रवी बिश्नोई यांनी झेल सोडले. त्याचाच फायदा घेत दक्षिण आफ्रिकन फलंदाजांनी मोठी धावसंख्या उभारली.