स्मृती मानधनाची आयसीसी रँकिंगमध्ये मोठी झेप
मुंबई, 20 सप्टेंबर**:** भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधनानं इंग्लंडविरुद्ध केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर आयसीसीच्या टी20 आणि वन डे रँकिंगमध्ये मोठी झेप घेतली आहे. टी20त स्मृतीनं थेट दुसरं स्थान गाठलं आहे. तर वन डेतही तिनं सातव्या स्थानावर उडी मारली आहे. डावखुऱ्या स्मृतीनं नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेत 111 धावा फटकावल्या होत्या. तर पहिल्याच वन डेत तिनं 91 धावांची खेळी केली. या कामगिरीमुळे तीनं टी20त दोन तर वन डेत तीन स्थानांनी पुढे सरकली. इतर भारतीय खेळाडूंमध्ये कर्णधार हरमनप्रीत कौर वन डेत 9व्या तर टी20त 14व्या स्थानावर पोहोचली आहे. वन डेत गोलंदाजांमध्ये दिप्ती शर्मानं 12वं स्थान गाठलं आहे. हेही वाचा - T20 World Cup: आयर्लंडच्या जर्सीवर भारतीय कंपनीचं नाव, टी20 वर्ल्ड कपसाठी ही कंपनी ऑफिशियल स्पॉन्सर पहिल्या वन डेत स्मृतीचं शतक हुकलं रविवारी झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात स्मृतीनं 91 धावांची खेळी केली. त्या सामन्यात 228 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. सलामीची शफाली वर्मा अवघ्या एका धावेवर बाद झाली. पण त्यानंतर स्मृतीनं यास्तिका भाटियाच्या साथीनं भारताच्या विजयाचा पाया रचला. त्या दोघींनी दुसऱ्या विकेटसाठी 96 धावांची भागीदारी केली.
मग स्मृतीनं कर्णधार हरमनसह तिसऱ्या विकेटसाठी 99 धावांची आणखी एक मोठी भागीदारी साकारली. मात्र 91 धावांवर असताना सोपा कॅच देऊन ती बाद झाली. स्मृतीचं शतक अवघ्या 9 धावांनी हुकलं. त्यानंतर हरमननं विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. तिनं नाबाद 74 धावांची खेळी केली.