शाहबाज अहमदचं पदार्पण
रांची, 9 ऑक्टोबर: टीम इंडियासाठी पदार्पण करण्याची शाहबाज अहमदची प्रतीक्षा अखेर संपली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या रांची वन डेत शाहबाजनं अखेर भारतीय संघात पदार्पण केले. यापूर्वी शाहबाजची भारतीय संघात निवड झाली होती. पण त्याला अंतिम अकरात संधी मिळाली नाही. मात्र रांचीतल्या वन डेत कर्णधार शिखर धवन आणि भारतीय संघ व्यवस्थापनानं बंगालकडून डोमेस्टिक क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या या अष्टपैलू खेळाडूवर विश्वास टाकला आणि प्लेईंग इलेव्हनमध्ये त्याचा समावेश केला. डावखुरी फिरकी गोलंदाजी आणि तळाचा फलंदाज अशी दुहेरी जबाबदारी पार पाडण्याची क्षमता या युवा खेळाडूमध्ये आहे. चौथ्याच ओव्हरमध्ये पहिली विकेट पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या शाहबाजनं रांचीच्या वन डेत आपल्या चौथ्याच ओव्हरमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली पहिली विकेट घेतली. त्यानं दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर यानेमन मलानला माघारी धाडलं. या सामन्यात शाहबाजनं 10 ओव्हरमध्ये 54 रन्समध्ये एक विकेट घेतली.
शाहबाज अहमदचा प्रवास शाहबाज अहमदचा जन्म हरियाणातला पण डोमेस्टिक क्रिकेटमध्ये तो बंगालचं प्रतिनिधित्व करतो. 2018 मध्ये त्याने लिस्ट ए क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानं आतापर्यंत 13 फर्स्ट क्लास मॅचमध्ये 28 तर 21 लीस्ट ए मॅचमध्ये 18 विकेट्स घेतल्या आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये शाहबाज विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळला होता.
हेही वाचा - MCA Election 2022: MCA अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करताच संदीप पाटलांविरोधात तक्रार दाखल, हे आहे तक्रारीचं कारण इंजिनियर शाहबाज अहमद शाहबाज हा मूळचा हरियाणातील मेवात जिल्ह्यातला. पण हरियाणात फारशी संधी न मिळाल्यानं तो क्रिकेटमध्ये करिअर करण्यासाठी तो बंगालला गेला. शाहबाजनं इंजिनियर व्हावं अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. त्यासाठी त्यानं इंजिनियरिंग कॉलेजमध्ये प्रवेशही घेतला. पण त्याचं मन अभ्यासात लागत नव्हतं. तो क्रिकेटसाठी क्लासेस बंक करायचा. ही बाब त्याच्या वडिलांना कळली तेव्हा त्यांनी शाहबाजला क्रिकेट किंवा इंजिनियरिंग यापैकी एकाची निवड करायला सांगितलं. शाहबाजनं तेव्हा क्रिकेट निवडलं पण त्याचबरोबर इंजिनियरिंगचा अभ्यास सुरु ठेवताना इंजिनियरची डिग्रीही मिळवली. त्यामुळे आता भारताकडून खेळलेल्या इंजिनियर क्रिकेटर्सच्या यादीत शाहबाजचा समावेश झाला आहे.
भारताचे इंजिनियर क्रिकेटर सध्या टीम इंडियाकडून खेळणारा ऑफ स्पिनर रवीचंद्रन अश्विनकडे बी. टेकची डिग्री आहे. अश्विनसह टीम इंडियाकडून खेळलेल्या जावगल श्रीनाथ, इरापल्ली प्रसन्ना, अनिल कुंबळे, कृष्णम्माचारी श्रीकांत, वेंकटराघवन यांनी इंजिनियरिंगची डिग्री घेतली आहे.