ऋतुराज गायकवाड
रांची, 12 नोव्हेंबर: एकीकडे टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाच्या पराभवावर चर्चा घडत असतानाच भारतात डोमेस्टिक क्रिकेटमध्ये अनेक खेळाडू लक्ष वेधून घेत आहेत. आजपासून देशातल्या प्रतिष्ठेच्या विजय हजारे करंडकाला सुरुवात झाली. वन डे फॉरमॅटमध्ये खेळवल्या जाणाऱ्या या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्र आणि मुंबई संघांनी विजयी सुरुवात केली. त्यामित्तानं आज चर्चा सुरु झाली ती महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडची. रेल्वेविरुद्धच्या सामन्यात महाराष्ट्रानं 7 विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला. त्यात कॅप्टन ऋतुराजनं खणखणीत शतक ठोकून बीसीसीआयच्या निवड समिती सदस्यांना दखल घेण्यास भाग पाडलं आहे. विजय हजारे करंडक आणि ऋतुराजचा फॉर्म विजय हजारे करंडकाच्या गेल्या सीझनमधला फॉर्म ऋतुराजनं यंदाही कायम राखला. मागच्या सीझनमध्ये त्यानं पाच मॅचमध्ये 4 शतकं झळकावली होती. तर आज पहिल्याच मॅचमध्ये रेल्वेविरुद्ध 124 धावांची नाबाद खेळी केली. ऋतुराजचं गेल्या दोन सीझनमध्ये या स्पर्धेतलं सहा सामन्यातलं हे पाचवं शतक ठरलं. तर लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्यानं झळकावलेलं हे 12वं शतक होतं. त्याच्यासह राहुल त्रिपाठीनंही आज 75 धावांचं योगदान दिलं. त्यामुळे महाराष्ट्रानं रेल्वेचं 219 धावांचं आव्हान आरामात पार केलं. हेही वाचा - Eng vs Pak: पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा, इंग्लंडच्या ड्रेसिंग रुममध्ये आनंद! पाहा काय आहे कारण? ऋतुराज विजय हजारे करंडकात (2021 पासून) 136 (112) 154* (143) 124 (129) 21 (18) 168 (132) 124* (123)
पण टीम इंडियात संधी नाही… गेल्या दोन वर्षात ऋतुराजनं आयपीएल आणि डोमेस्टिक क्रिकेटमध्ये खोऱ्यानं धावा केल्या आहेत. सीएसकेकडून खेळताना 2021 च्या सीझनमध्ये त्यानं ऑरेंज कॅपही पटकावली होती. त्या जोरावर त्याची भारतीय संघात निवडही झाली. पण गेल्या आयर्लंड, झिम्बाब्वे, वेस्ट इंडिज दौऱ्यात त्याच्या वाट्याला केवळ एकच टी20 सामना आला. तर वन डेतही पदार्पणाचा एकमेव सामना खेळवून त्याला पुन्हा डग आऊटमध्ये बसवण्यात आलं. ऋतुराजनं गेल्या वर्षी टी20 पदार्पण केलं. मात्र आतापर्यंत गेल्या दोन वर्षात त्याला केवळ 9 सामनेच प्लेईंग इलेव्हनमध्ये जागा मिळाली आहे. दुर्दैवानं फॉर्मात असतानाही त्याला आगामी न्यूझीलंड दौऱ्यातल्या वन डे आणि टी20 मालिकेतूनही वगळण्यात आलं. हेही वाचा - T20 World Cup: पराभवानंतर मैदानातच रोहित रडला, पण त्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये पाहा काय काय घडलं? वर्ल्ड कपनंतर ऋतुराजला संधी? टी20 वर्ल्ड कपमधल्या पराभवानंतर भारतीय संघात बदलाचे वारे वाहण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे आगामी काळात टीम इंडियात युवा खेळाडूंना जास्तीत जास्त संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यात ऋतुराजची सध्याची कामगिरी पाहता त्याचं भारतीय संघातलं स्थान पक्क आहे. पण त्याला जास्तीत जास्त खेळण्याची संधीदेखील बीसीसीआयनं उपलब्ध करुन देणं गरजेचं आहे.