राहुल द्रविड आणि बुमरा
गुवाहाटी, 01 ऑक्टोबर: टीम इंडियाचा अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमरा आगामी टी20 वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियाला जाणार की नाही याबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे. बुमराच्या दुखापतीवर सध्या बंगळुरुतल्या एनसीएमध्ये बीसीसीआयची मेडिकल टीम लक्ष ठेऊन आहे. पण तो ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी पुरेसा फिट आहे की नाही याबाबत बीसीसीआयनं अजून कोणतीही अधिकृत अपडेट दिलेली नाही. दरम्यान उद्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेतली दुसरी टी20 गुवाहाटीत पार पडणार आहे. त्याआधी झालेल्या आजच्या पत्रकार परिषदेत टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी मोठं विधान केलं आहे. काय म्हणाले कोच द्रविड? गुवाहाटी टी20 आधी झालेल्या या पत्रकार परिषदेत द्रविडनं म्हटलंय की.. ‘तुम्हाला सगळ्यांनाच ठाऊक आहे की बुमरा अजूनही टी20 वर्ल्ड कपसाठीच्या भारतीय संघातून बाहेर गेलेला नाही. बुमरा फक्त दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 संघातून बाहेर गेला आहे. पुढच्या काही दिवसात आम्ही पाहणार आहोत की काही होऊ शकतं का. आम्हाला जेव्हा अधिकृत माहिती मिळेल तेव्हा आम्ही ती तुमच्याशी शेअर करु.’ द्रविडच्या या विधानानंतर हे स्पष्ट होतंय की बुमरा टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलियाला जाईल ही आशा अजूनही कायम आहे.
स्ट्रेस फ्रॅक्चरमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेनंतर बुमराला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी20त खेळता आलं नाही. पण त्यानंतर तो उर्वरित दोन्ही सामन्यात खेळू शकणार नाही अशी माहिती बीसीसीआयनं दिली. त्यामुळे त्याच्या जागी उर्वरित दोन सामन्यांसाठी मोहम्मद सिराजचा संघात समावेश करण्यात आला आहे. हेही वाचा - Irani Trophy 2022: टीम इंडियात येणार आणखी एक मुंबईकर, 29 मॅचमध्ये ठोकलं दहावं शतक गांगुलीनंही बुमराबाबत केलं होतं विधान दरम्यान बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनंही काल बुमराबाबत असंच एक विधान केलं होतं. एका मीडिया प्लॅटफॉर्मशी बोलताना गांगुली म्हणाला होता की ‘जसप्रीत बुमरा अजूनही दुखापतीमुळे संघाबाहेर गेलेला नाही. वर्ल्ड कपला अजूनही काही वेळ शिल्लक आहे.’ गांगुलीच्या या विधानानंतर सध्या सोशल मीडियात उलटसुलट चर्चा रंगली होती. त्यामुळे आता गांगुली आणि त्यापाठोपाठ द्रविड यांच्या विधानानंतर बुमरासंदर्भात अधिकृतरित्या काही चांगली बातमी येणार का? हे पाहणं महत्वाचं ठरेल.