मुंबईचा धडाकेबाज फलंदाज सरफराज खाननं डोमेस्टिक क्रिकेटमधला फॉर्म कायम राखला आहे. रणजी ट्रॉफी फायनल, मग दुलीप ट्रॉफी फायनल आणि आता इराणी ट्रॉफीमध्येही सरफराजनं शतकी खेळी साकारली आहे.
सरफराजनं इराणी ट्रॉफी सामन्यात रेस्ट ऑफ इंडिया संघाकडून खेळताना पहिल्याच दिवशी सौराष्ट्रविरुद्ध नाबाद 125 धावांची खेळी केली. फर्स्ट क्लास क्रिकेटमधलं त्याचं हे गेल्या 29 सामन्यातलं दहावं शतक ठरलं आहे.
इराणी ट्रॉफीतल्या या शतकासह सरफराजनं टीम इंडियाच्या कसोटी संघात येण्यासाठी निवड समितीचं लक्ष वेधून घेतलं आहे. कारण गेल्या 43 इनिंगमध्ये सरफराजनं 82 च्या सरासरीनं 2892 धावा केल्या आहेत. त्यात 10 शतकं आणि 8 अर्धशतकांचा समावेश आहे.
फर्स्ट क्लास क्रिकेटमधल्या सरासरीबद्दल बोलायचं झाल्या महान क्रिकेटर सर डॉन ब्रॅडमन (99.94) यांच्यानंतर सरफराजचा नंबर लागतो. (82.63)
यंदाच्या रणजी मोसमात सरफराजनं मुंबईकडून सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्यानं 6 सामन्यातील 9 डावात 123 च्या सरासरीनं 982 धावांचा रतीब घातला होता. त्यात 4 शतकं आणि 2 अर्धशतकंही होती. मध्य प्रदेशविरुद्ध फायनलमध्ये सरफराजनं 134 धावांची झुंजार खेळी केली होती.
सरफराज खाननं आयपीएल मध्येही 2015 पासून आतापर्यंत 46 सामने खेळले आहेत. सध्या तो दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग आहे.