लायनल मेसी कतारमध्ये खेळणार शेवटचा वर्ल्ड कप
मुंबई, 7 ऑक्टोबर: भारत जरी क्रिकेटवेडा देश असला तरी जगात सर्वात लोकप्रिय खेळ कोणता असं विचाराल तर उत्तर येईल फुटबॉल. जगभरात फुटबॉलचे असंख्य चाहते आहेत. याच खेळातले त्यांचे देव आहेत पेले, माराडोना, रोनाल्डो, मेसी हे महान खेळाडू. यापैकी सध्या खेळत असलेले मेसी आणि रोनाल्डो हे तर फुटबॉल प्रेमींच्या गळ्यातले ताईत आहेत. भारतात या दोघांचा खेळ पाहण्यासाठी लोक रात्र रात्र जागवतात. अवघ्या काही दिवसात फुटबॉलप्रेमींना फिफा वर्ल्ड कपमध्ये या दोघांचा खेळ पाहण्याची संधी मिळणार आहे. पण त्याआधीच त्यातल्या एकानं फुटबॉल प्रेमींना धक्का दिलाय. कारण कतारमधला आगामी फिफा वर्ल्ड कप हा त्याच्या कारकीर्दीतला शेवटचा वर्ल्ड कप असल्याची त्यानं घोषणा केली आहे. मेसीचा शेवटचा वर्ल्ड कप अर्जेन्टिनाचा महान फुटबॉलर लायनल मेसीनं तो शेवटचा वर्ल्ड कप खेळणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. कारण मेसीनं शेवटचा वर्ल्ड कप खेळणार असल्याचं म्हणत थेट निवृत्तीचे संकेत दिले आहेत. मेसी सध्या 35 वर्षांचा आहे. मेसीनं एका मुलाखतीत म्हटलंय… ‘शारीरिकदृष्ट्या मी सध्या स्वत:ला फिट समजतोय. मला खात्री आहे की वर्ल्ड कपआधी माझा सीझन चांगला जाईल. मी दुखापतीतून सावरलोय आणि हळूहळू चांगलं वाटतंय… पण हे असं पहिल्यांदाच झालेलं नाही. मी आता वर्ल्ड कपचे दिवस मोजतोय. हा माझ्यासाठी शेवटचा वर्ल्ड़ कप आहे.’
हेही वाचा - T20 World Cup: टीम इंडियाच्या टी20 वर्ल्ड कप मोहिमेला सुरुवात, BCCI ने शेअर केला हा खास फोटो फुटबॉलचा बादशाह मेसी लायनल मेसी फक्त सध्याच्या घडीचाच नाही तर फुटबॉलच्या इतिहासातल्या सर्वश्रेष्ठ फुटबॉलर्सपैकी एक आहे. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये मेसीनं आजवर 90 गोल केले आहेत. सर्वाधिक गोल करणाऱ्या फुटबॉलर्सच्या यादीत मेसी सध्या तिसऱ्या नंबरवर आहे. तर त्याचाच समकालीन फुटबॉलर पोर्तुगालचा रोनाल्डो 117 गोलसह पहिल्या नंबरवर आहे.
दुसरीकडे क्लब फुटबॉलमध्ये मेसी सध्या पॅरिस सेंट जर्मन संघाशी करारबद्ध आहे. पण त्याआधी अनेक वर्ष तो बार्सिलोनाचा महत्वाचा खेळाडू होता. बार्सिलोनासाठी त्यानं तब्बल 474 गोल्स केले आहेत. फुटबॉलविश्वातला सर्वात प्रतिष्ठेचा आणि मानाचा बॅलन डी ओर पुरस्कार मेसीनं सर्वाधिक 7 वेळा पटकावला आहे.