जेमिमा रॉड्रिग्सची अर्धशतकी खेळी
सिल्हेत-बांगलादेश, 1 ऑक्टोबर: आजपासून बांगलादेशच्या सिल्हेतमध्ये महिलांच्या आशिया कप स्पर्धेला सुरुवात झाली. स्पर्धेच्या सुरुवातीलाच भारताची गाठ पडली ती श्रीलंकेशी. या सामन्यात हरमनप्रीत कौरच्या भारतीय संघानं पहिल्यांदा बॅटिंग करताना 6 बाद 150 धावा स्कोअरबोर्डवर लावल्या. विशेष म्हणजे त्यात एका मुंबईकर खेळाडूचा मोठा वाटा होता. मुंबईच्या जेमिमा रॉड्रिग्सनं या सामन्यात दमदार फलंदाजी करताना 53 बॉलमध्ये 76 धावांची खेळी केली. त्यामुळे भारताला 150 धावांची मजल मारता आली. दुखापतीनंतर कमबॅक जेमिमा रॉड्रिग्सला इंग्लंड दौऱ्याआधी मनगटाला दुखापत झाली होती. त्यामुळे इग्लंडविरुद्धच्या टी20 आणि वन डे मालिकेला मुकावं लागलं होतं. यादरम्यान महिनाभर जेमिमानं बॅटही हातात घेतली नव्हती. पण त्यानंतर तिनं आशिया कपच्या सलामीच्या सामन्यात जोरदार कमबॅक करताना 76 धावांची खेळी साकारली. तिच्या या खेळीत 11 फोर आणि एका सिक्सचा समावेश होता. या सामन्यात सलामीची स्मृती मानधना (6) आणि शफाली वर्मा (10) ही जोडी स्वस्तात माघारी परतली. पण त्यानंतर जेमिमानं कॅप्टन हरमनप्रीतच्या साथीनं टीम इंडियाचा डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 92 धावांची महत्वपूर्ण भागीदारी साकारली. हरमन 33 धावा काढून बाद झाली.
सातव्या विजेतेपदाचं लक्ष्य भारतीय पुरुष संघाप्रमाणेच महिलांच्या आशिया चषकावरतीही टीम इंडियाचं वर्चस्व आहे. कारण आजवर झालेल्या 7 पैकी 6 स्पर्धा भारतानं जिंकल्या आहेत. तर बांगलादेशनं 2018 साली सहा वेळा विजेत्या भारतीय संघाला हरवण्याचा पराक्रम केला होता. त्यानंतर 2020 साली कोरोनामुळे ही स्पर्धा रद्द करण्यात आली होती. पुढे 2021 सालीही या स्पर्धेचं आयोजन होऊ शकलं नाही. यंदा मात्र सातव्या विजेतेपदासाठी हरमनप्रीतची टीम इंडिया स्पर्धेत उतरली आहे. हेही वाचा - Eng vs Pak: इंग्लंड-पाकिस्तान सामन्यात भर मैदानात कळवळला अम्पायर, Video Viral 7 ऑक्टोबरला महामुकाबला महिलांच्या या आशिया कप क्रिकेट स्पर्धेत एकूण सात संघ सहभागी झाले आहेत. त्यामुळे राऊंड रॉबिन पद्धतीनं ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. म्हणजेच प्रत्येक संघ 6-6 सामने खेळणार आहे. पण सगळ्यांचं लक्ष असेल ते या स्पर्धेतल्या महामुकाबल्याकडे. भारत आणि पाकिस्तान संघ महिलांच्या आशिया कपमध्येही आमने सामने येणार आहेत. 7 ऑक्टोबरला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचं भारतासमोर आव्हान असेल.